आमचा अंत पाहू नका; महिंद्रा कंपनीतील कामगारांच्या पत्नींचा एल्गार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

टाकवे बुद्रुक: 'महिना झाला कारभारी कामाला नाही, आमचे हातावर पोट आहे.घरातील रेशन संपून गेले आहे, मुलांची शाळेची फी भरता येईना, आज तर नुसता आमटी भात लेकरांना खाऊ घातला आहे. इतके वर्ष रक्ताचे पाणी करून कष्ट केले, त्याचे हेच फळ मिळाले काय? या पुढे आम्ही जगायचे कसे ,महिना झाला तरी घरधन्याला कामावर घेईना, म्हणून आम्हीच रस्त्यावर उतरलो आहे. महागाईने कंबरडे मोडले त्यात हाताला काम नाही.या जगात आम्हाला कोणी वाली नाही काय?

टाकवे बुद्रुक: 'महिना झाला कारभारी कामाला नाही, आमचे हातावर पोट आहे.घरातील रेशन संपून गेले आहे, मुलांची शाळेची फी भरता येईना, आज तर नुसता आमटी भात लेकरांना खाऊ घातला आहे. इतके वर्ष रक्ताचे पाणी करून कष्ट केले, त्याचे हेच फळ मिळाले काय? या पुढे आम्ही जगायचे कसे ,महिना झाला तरी घरधन्याला कामावर घेईना, म्हणून आम्हीच रस्त्यावर उतरलो आहे. महागाईने कंबरडे मोडले त्यात हाताला काम नाही.या जगात आम्हाला कोणी वाली नाही काय? यापुढे आमचा अंत पाहू नका आमच्या मालकांना कामावर रूजू करून घ्या,' अशी विनवणी करायला कान्हेतील महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह कंपनीच्या प्रवेशद्वारावर कामावर काढून टाकलेल्या कामगारांच्या पत्नींने एल्गार उभा केला आहे.

कंपनीच्या प्रवेशद्वारावर काल पर्यंत फक्त कामगार बांधवच होते, आज त्यांच्या लढयात त्यांच्या लहान लेकरांना घेऊन माय माऊल्यांनी उडी घेतली आहे. रणरणत्या उन्हात या भगीनीने लहान लेकर घेऊन ठिय्या धरून बसल्या आहेत.रणरणत्या उन्हाच्या झळा बसून लेकर आजारी पडली किंवा एखादी दुर्घटना घडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी कंपनी व्यवस्थापनावर राहील असा निर्वाणीचा इशारा या रणरणांगिनीने दिला आहे. बायडाबाई भुंडे, उषा इंगळे, पुष्पा देशमुख, अनिता गरूड, भोराबाई गभाले, अनिता काकरे,स्मिता जाधव, सपना तायडे, निर्मला म्हस्के, रेखा गायकवाड, बेबी मराठे, मुक्ता माळी,सुरेखा जावळेकर यांच्या शेकडो भगीनीने कंपनीच्या व्यवस्थापनाचा पंचनामा केला. इतक्या वर्षी आमच्या नवऱ्यांकडून कष्टाची कामे करून घेतली, आता त्यांचे वय झाले तर त्यांना वा-यावर सोडून दिले तर आम्ही प्रपंचाचा गाडा कसा ओढयाचा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कंपनीने व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घ्यावी

आमच्या यजमानांना नोकरीत रूजू करून घ्यावे अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल अशी टोकाची भूमिका या सुवासिनीने घेतली. रथ सप्तमी पर्यंत सर्वत्र हळदी कुंकूवाचा उत्सव सर्वत्र सुरू आहे. आम्ही मात्र आमच्या सौभाग्याच्या लेणं मागे खंबीरपणे उभे आहोत. काल पर्यंत कंपनीच्या प्रवेशद्वार जवळील पिण्याच्या पाण्याचा नळ चालू होता, आज मात्र आम्ही मुलाबाळांसह येथे आलो तर कंपनीने पिण्याचे पाणी बंद केले. इतक्या वर्षी रक्ताचे पाणी करून कष्ट केले त्याचे हेच फळ आहे काय? असा संताप त्यांनी व्यक्त केला. काल पासून सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनात सर्व कामगार रात्रीच्या थंडीत प्रवेशद्वारावरच तळ ठोकून बसले आहेत. कामगारांचा हा पवित्रा पाहता हे अंदोलन अधिक तीव्र होईल अशी प्रतिक्रिया मनसे कामगार संघटनेने दिली आहे. वडगाव मावळ पोलीसांनी बंदोबस्त ठेवला आहे. दुपारी उन्हात एका कामगाराला चक्कर आली होती, त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. 

Web Title: esakal marathi news workers agitation family supports