कलावंताने दबलेल्यांचा आवाज व्हावे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

"आशय पक्का असेल तर लघुचित्रपटाची ताकद ही एखाद्या कादंबरी किंवा पूर्णवेळेच्या चित्रपटाइतकी असू शकते. असे चित्रपट "सांस्कृतिक कुपोषण' दूर करणारे, विचार व्यापक-खोलवर रुजवणारे ठरावेत. सध्या लघुचित्रपटांची चळवळ जगभर वाढत चालली आहे; पण लघुचित्रपट म्हणजे चित्रपट तयार करण्याची पायरी नव्हे.'' 
- अतुल पेठे, दिग्दर्शक 

पुणे : "ज्यांना आवाज नाही, अशा दबलेल्या समूहाचा आवाज मोकळा करून देणे, त्यांचा आवाज होणे हे कलेचे साधन आहे. हा विचार अण्णा भाऊ साठे यांनी कायम जपला,'' असे मत दिग्दर्शक अतुल पेठे यांनी व्यक्त केले. कलावंतांकडे राजकीय विचारसरणी हवी. त्याला राजकीय विधान करता आले पाहिजे, असेही ते म्हणाले. 

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आयोजित अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन पेठे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. अभिनेते रामचंद्र धुमाळ, कालिदास कांबळे, आयोजक सचिन बगाडे, दिग्दर्शक संदीप ससाणे, नवनाथ ढमे उपस्थित होते. 

पेठे म्हणाले, "कलेसाठी कला की जीवनासाठी कला, असे पूर्वी वाद होते; पण अण्णा भाऊंची कला ही जीवनासाठी होती. वंचित, शोषित, पीडित, स्त्रिया, दबलेले घटक यांच्या भावना त्यांनी गीतांतून, शाहिरीतून मांडल्या. एखाद्या माणसाची प्रतिभा किती उत्तुंग असावी, याचे दर्शन आपल्याला त्यांच्या साहित्यातून होते. अण्णा भाऊंना लोकशाहीर तर म्हटलेच पाहिजे. यासोबतच ते साम्यवादी विचारांचेही होते.'' 
महोत्सवातील विविध लघुचित्रपट रविवारपर्यंत (ता. 15) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळात पाहता येतील. 

 

Web Title: esakal news atul pethe news

टॅग्स