वृक्ष संगोपनासाठी पर्यावरणप्रेमी सरसावला पुढे...

मिलिंद संधान
सोमवार, 3 जुलै 2017

व्यवसायाने वॉशिंग सेंटर व वॉटर सप्लायर्स असलेले दत्तात्रय भोसले यांच्याकडे पाण्याचे टँकर व कुपनलिका उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्या रोजच्या व्यवसायातून काही वेळ वृक्षसंगोपणाकरीता त्यांच्या कामगारांच्या सहायाने ते पुर्ण करणार आहेत. त्यामुळे रोजचा व्यवसाय सांभाळून हा पर्यावरणप्रेंमी सामाजिक बांधिलकी जपत आहे. 

नवी सांगवी - पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास आणि त्याचे आत्तापर्यंत भोगावे लागत असलेले दुष्परिणाम याची जाणिव सर्वांनाच झालेली आहे. त्यामुळे मागिल काही चार दोन वर्षापासून केंद्र, राज्य शासन ते विविध सामाजिक संघटनांनी वृक्षारोपणाचे कार्य जोरदार हातात घेतले आहे. पावसाळ्यात झाडे लावण्याचे कार्यक्रम दररोज कोठे ना कोठे चालु असतात. परंतु वर्तमानपत्रे, सोशल मिडियावर या कार्यक्रमांचे फोटो झळकून झाल्यावर सर्वांनाच या लावलेल्या झाडांचा विसर पडतो. त्यामुळे त्यातील बहुतांशी झाडे पाण्याअभावी अथवा या ना त्या कारणाने मरून जातात. 

परंतु सांगवीतील पर्यावरण प्रेमी दत्तात्रय भोसले यांनी मात्र सांगवी पिंपळे गुरव परिसरात झाडे जगविण्याचा माणस केला आहे. शासनाच्या वतीने वृक्षारोपणाला प्रोत्साहन दिले जात असताना शालेय विद्यार्थ्यांपासून तरूण, जेष्ठ, महिला सर्वच लोक पावसाळ्यात वृक्षारोपण करताना दिसत आहेत परंतु कालांतराने हे वृक्ष संगोपना अभावी नष्ट होतात. त्यामुळे दरवर्षी ' तोच तो नवा ड्रामा ' असा अनुभव झाडांच्या बाबतीत पहायला मिळत आहे. त्यामुळे भोसले यांनी समाजहीत पाहता वृक्षसंगोपणाचे कार्य सांगवी पिंपळे गुरव परिसरात सुरू केले आहे. 

पर्यावरण प्रेमी दत्तात्रय भोसले म्हणाले, "देश आपल्यासाठी काय करतो त्यापेक्षा आपण देशासाठी काय करतो या भावनेतून मी वृक्ष संगोपण करणार आहे. त्यामुळे ज्या ज्या सामाजिक संस्था वृक्षारोपण करतात त्यांना जर माझी मदत हवी असेल तर मी झाडांची आळी तयार करणे, त्याच्या भोवतालचे तण काढणे, तग धरलेल्या झाडे वाऱ्याने मोडू नये म्हणून त्यांना काठ्यांचा आधार देणे व पाणी घालणे अशी कामे मोफत करणार. "

Web Title: esakal news sakal news pune news plantation news social work