पुणे रेल्वे स्थानकावरील सरकते जिने शोभेपुरतेच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

पुणेः रेल्वे स्थानकावर बसविलेले नवीन पाच एस्केलेटर (सरकते जिने) बंद पडले असल्याने प्रवाशांची गैरसाेय हाेत आहे..

पुणेः पुणे रेल्वे स्थानकावर बसविलेले नवीन पाच एस्केलेटर (सरकते जिने) गेल्या काही दिवसांपासून बंद पडले आहेत. त्यामुळे हे जिने शोभेचे बनले आहेत. प्रवाशांकडून योग्यरीत्या वापर होत नसल्याने ते बंद पडत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. 

इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने स्थानकांच्या विकासांतर्गत आरक्षण कक्षाजवळील नवीन पादचारी पुलावर पाच एस्केलेटर (सरकते जिने) बसविले आहेत. टप्प्याटप्प्याने ते प्रवाशांसाठी खुलेही केले होते. मात्र, सुरवातीपासूनच ते बंद पडण्याच्या घटना घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते कायमचे बंद पडले आहेत. तसेच जुना सरकता जिनादेखील बंदच आहे. रेल्वे प्रवाशांना या सुविधेचा वापर करता येत नाही.

ज्येष्ठ, गर्भवती, लहान मुले यांना स्थानकाबाहेरून फलाटपर्यंत जाण्यासाठी पादचारी पुलावरील पायऱ्या चढाव्या आणि उतराव्या लागत आहेत. त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Escalators not working on Pune Railway station