पुणे रेल्वे स्थानकातील सरकते जिने फक्त शोभेचे!

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

पुणे रेल्वे स्थानकावर बसविलेले नवीन पाच एस्केलेटर (सरकते जिने) गेल्या काही दिवसांपासून बंद पडले आहेत. त्यामुळे हे जिने शोभेचे बनले आहेत. प्रवाशांकडून योग्यरीत्या वापर होत नसल्याने ते बंद पडत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

पुणे - पुणे रेल्वे स्थानकावर बसविलेले नवीन पाच एस्केलेटर (सरकते जिने) गेल्या काही दिवसांपासून बंद पडले आहेत. त्यामुळे हे जिने शोभेचे बनले आहेत. प्रवाशांकडून योग्यरीत्या वापर होत नसल्याने ते बंद पडत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने स्थानकांच्या विकासांतर्गत आरक्षण कक्षाजवळील नवीन पादचारी पुलावर पाच एस्केलेटर (सरकते जिने) बसविले आहेत. टप्प्याटप्प्याने ते प्रवाशांसाठी खुलेही केले होते. मात्र, सुरवातीपासूनच ते बंद पडण्याच्या घटना घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते कायमचे बंद पडले आहेत. तसेच जुना सरकता जिनादेखील बंदच आहे. रेल्वे प्रवाशांना या सुविधेचा वापर करता येत नाही. ज्येष्ठ, गर्भवती, लहान मुले यांना स्थानकाबाहेरून फलाटपर्यंत जाण्यासाठी पादचारी पुलावरील पायऱ्या चढाव्या आणि उतराव्या लागत आहेत. त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

प्रवाशांच्या सेवेसाठी प्रशासनाने स्थानकावर एस्केलेटर बसविले, मात्र त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने ते वारंवार बंद पडत आहेत. या जिन्यांचा प्रवाशांना कुठलाच फायदा होत नाही.
- हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप

मी ज्येष्ठ नागरिक असून मला दम्याचा आजार आहे. पादचारी पुलावरील पायऱ्या चढताना आणि उतरताना दमछाक होते. त्यामुळे माझ्यासाठी सरकते जिने सुरू राहणे खूप गरजेचे आहे.
- बाबासाहेब राऊत, प्रवासी

प्रवाशांनी सरकत्या जिन्यांचा वापर व्यवस्थित केला नाही तर ते बंद पडतात. तसेच जास्त वजन आल्यास, बराचवेळ वापर झाला नाही तर ते बंद पडतात. दोष असतील तर ते दूर करण्यात येतील.
- रमेश खोत, अधिकारी, इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: escalators not working pune railway station