फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पुणे - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याकडे ठेवी ठेवणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना सरकारने काहीतरी दिलासा द्यावा. निदान फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठेवीदारांच्या चैतन्य वाटिका ग्रुप तर्फे बुधवारी(ता.5) पत्रकार परिषदेत करण्यात आली. संस्थेचे सभासद दीपक फडणीस, प्रकाश बापट, राजन बिचे, अजित गुप्ते, सुरेश देव यांच्यासह अन्य सदस्य या वेळी उपस्थित होते. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

या वेळी बोलताना फडणीस म्हणाले, आमच्या ग्रुपचे सदस्य हे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आहेत. बॅंकेच्या तुलनेत डीएसकेंकडून थोडेसे जास्त व्याज मिळते म्हणून निवृत्तीनंतर आम्ही आमचा सर्व पैसा त्यांच्याकडे गुंतवला. मात्र, वृद्धावस्थेत औषधपाणी आणि इतर अत्यावश्‍यक खर्चासाठीही आम्ही त्याच ठेवींवर अवलंबून आहोत. अशाप्रकारे सुमारे 35 हजार ठेवीदारांपैकी बहुतांशजण हलाखीचे जीवन व्यतीत करीत आहेत. 

सत्ताधाऱ्यांकडून टोलवाटोलवी 
ते म्हणाले, कुलकर्णी यांना अटक झाल्यानंतर, थोडी तरी रक्कम मिळेल, अशी अपेक्षा होती, मात्र तीही फोल ठरली. त्यामुळे आम्ही, पालकमंत्री गिरीश बापट यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलतो, असे आश्‍वासन दिले. मात्र, वारंवार भेटल्यानंतरही आम्हाला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांना एकदा नव्हे तर तीन वेळा निवेदन दिले. मात्र आम्हाला साधी पोचही मिळाली नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनात आमचा विषयही काढला जात नाही. या परिस्थितीत, आता आमचा धीर खचत चालला आहे. सरकारने निदान, या खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे करा, अशीही मागणी त्यांनी केली. 

सर्व ठेवीदारांनी एकत्र यावे 
प्रकाश बापट म्हणाले, आम्ही सर्व जण मॉडेल कॉलनीमधील चित्तरंजन वाटिका येथे दर रविवारी सकाळी साडेनऊ ते अकरा वाजेदरम्यान भेटून ठेवी परत मिळवण्यासाठी काय करता येईल, याबाबत विचार विनिमय करतो. इतरही ठेवीदार आणि त्यांच्या छोट्या-छोट्या संघटना यात सहभागी झाल्यास या प्रश्‍नाला चालना मिळू शकेल. तरी अन्य ठेवीदारांनी रविवारच्या अनौपचारिक बैठकीला उपस्थित राहावे, असेही आवाहन त्यांनी केले.

Web Title: Establish a fast track court Demand at the press conference of DSK Depositors