देशासाठी नैतिकतेने काम करावे - तुषार गांधी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

पुणे - ‘‘ब्रिटिशांनी देशाचे विभाजन केले; परंतु स्वातंत्र्यानंतर आपल्याच लोकांनी आपले देशांतर्गत विभाजन केले आहे. राष्ट्र हे काही भूखंड, राष्ट्रचिन्ह, राष्ट्रध्वज यापुरते मर्यादित असते का? राष्ट्र हे खऱ्याअर्थाने एकात्मतेचे प्रतीक असते. देशाचे भवितव्य सुधारण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली नैतिक जबाबदारी म्हणून काम करायला हवे,’’ असे मत महात्मा गांधी फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त तुषार गांधी यांनी व्यक्त केले.

‘सकाळ साप्ताहिक’च्या बत्तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त गांधी यांचे ‘महात्मा गांधी आणि सध्याची सामाजिक-राजकीय परिस्थिती’ या विषयावर सोमवारी व्याख्यान झाले. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, संपादक-संचालक श्रीराम पवार, मुख्य संपादक राहुल गडपाले उपस्थित होते.

‘‘देशाची स्तुती करायची असेल, तर भूतकाळात डोकवावे लागते. कारण, वर्तमान काळात प्रशंसा करण्यासारखे काहीच नाही. सार्वजनिक जीवनात कोणताही आशेचा किरण दिसत नाही, हे खरे आहे. भ्रष्टाचाराबद्दल केवळ बोलण्यापेक्षा आपण स्वत: बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत,’’ असेही गांधी यांनी नमूद केले. ‘‘देशातील व्यवस्थेविरोधात प्रश्‍न उपस्थित करणे, याला आजकाल देशद्रोह म्हटले जाते. आम्हाला काम करू द्यात, प्रश्‍न विचारू नका, अशी भूमिका सध्याच्या राज्यकर्त्यांची आहे,’’ अशी टीकाही त्यांनी केली.

प्रतापराव पवार म्हणाले, ‘‘जबाबदार समाजनिर्मितीसाठी ‘सकाळ’ काम करत आहे. कुटुंब केंद्रस्थानी मानून ‘सकाळ साप्ताहिक’ची निर्मिती केलेली आहे. काळानुसार त्यात बदलही केलेले आहेत. त्याबद्दल काही सूचना असतील, तर आम्हाला त्या कळवाव्यात.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘सकाळ साप्ताहिक’च्या सहसंपादक ऋता बावडेकर यांनी केले.

तुषार गांधी म्हणाले...
    आज केवळ राष्ट्र, राष्ट्रवाद, समृद्धी असे काल्पनिक चित्र उभे केले जात आहे. वास्तविकता आणि स्वप्न यातील अंतर प्रचंड आहे.   
    गाव ते राजधानी असा विकासाचा प्रवास व्हावा, असे बापूंचे स्वप्न होते. परंतु, आज देशातील गावे बकाल होत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ethics work for the country says tushar gandhi