
एका तरुणाला युरोपात पिझ्झा शेफ पदावर नोकरीचे आमिष दाखवले. परंतु या तरुणाला परदेशात एका बेकरीत सफाई कर्मचाऱ्याची नोकरी करण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे.
Pune Fraud : युरोपात शेफच्या नोकरीचे आमिष, परंतु दिले सफाईचे काम
पुणे - एका तरुणाला युरोपात पिझ्झा शेफ पदावर नोकरीचे आमिष दाखवले. परंतु या तरुणाला परदेशात एका बेकरीत सफाई कर्मचाऱ्याची नोकरी करण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी एका तरुणाने (वय ३०, रा. खिलारेवाडी, कर्वे रस्ता) फिर्याद दिली आहे. त्यावरून चतु:शृंगी पोलिसांनी एका २९ वर्षीय तरुणाविरुद्ध (रा. दीपबंगला चौक, शिवाजीनगर) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार फर्ग्युसन रस्त्यावरील एका कंपनीच्या कार्यालयात मार्च २०२२ मध्ये घडला.
आरोपीने या तरुणाला युरोपात पिझ्झा शेफ या पदावर नोकरीस लावून ११०० युरो (सुमारे ९६ हजार रुपये) पगार देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी या तरुणाकडून ९ लाख ३० हजार रुपये घेतले. परंतु प्रत्यक्षात युरोपमधील एका बेकरीमध्ये सफाई कर्मचाऱ्याची (क्लिनिंग जॉब) नोकरी करावी लागेल. तसेच, ९०० युरो (सुमारे ७८ हजार रुपये)पगार मिळेल, असे सांगितले.
कमी पगारात काम करण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तरुणाला अमली पदार्थाच्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रतन गायकवाड करीत आहेत.