रोजचाच दिन व्हावा बालदिन | Childrens Day | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोजचाच दिन व्हावा बालदिन
रोजचाच दिन व्हावा बालदिन

रोजचाच दिन व्हावा बालदिन

निरागसता, खळाळता उत्साह, कायम उत्सुकता आणि अद्भुततेचं वेड याने बालपण भारलेलं असतं. या गुणांवर शाबासकीची थाप देण्यासाठी, लहान मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी बालदिन साजरा केला जातो. मात्र, रोजचा दिन हा बालदिन होण्याची गरज असल्याचं मत ज्येष्ठ बालसाहित्यकार अनंत भावे, राजीव तांबे, एकनाथ आव्हाड व ज्योती कपिले यांनी व्यक्त केलं. मुलांचा कल ओळखून त्यांना विविध संधी उपलब्ध करून देणं, मूलकेंद्रित विचार करण्याची पालकांना सवय लागणं, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचं त्यांनी सांगितलं.

संवादकौशल्यावर भर हवा

अनंत भावे

कोरोनामुळे मुले दीड वर्षापासून घरीच आहेत. अशा वातावरणाचा त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होण्याची भीती असते. मुलं एकलकोंडी व चिडचिडी बनण्याची शक्यता असते. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी मुलांबरोबर संवाद साधायला हवा. त्यांना गाणी, गोष्टींच्या माध्यमातून बोलतं करायला हवं.

 • मुलांनी मराठी, हिंदी, इंग्रजीबरोबरच अन्य प्रादेशिक भाषेतील अनुवादित पुस्तकं वाचली पाहिजेत.

 • मुलांना एकत्रित करून पालकांनी गोष्टी सांगायला हव्यात. पालकांना जर गोष्टी सांगायला जमत नसतील तर त्यांनी अशा गोष्टी सांगणाऱ्या व्यक्तींना निमंत्रित केलं पाहिजे.

 • मुलांना अद्भुततेचं वेड असतं. त्याचा फायदा घेत, त्यांच्या ज्ञानात भर पडेल असं साहित्य त्यांच्यापर्यंत पोचवलं पाहिजे.

 • मुलांना शब्दांशी खेळायला फार आवडतं. ही आवड वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

 • वेगवेगळ्या रिॲलिटी शोमध्ये मराठीतील सुंदर कविता व गाणी मुलांकडून म्हणून घेतली पाहिजेत.

कल ओळखून हवे प्रोत्साहन

राजीव तांबे

बालदिन हा वर्षभर राबवायला हवा. एकाच दिवशी तो साजरा करून, वर्षभर त्याकडे दुर्लक्ष करणे अयोग्य आहे. लहान मुलांचा कल ओळखून, त्यांना आवडेल ते करू देण्याची संधी म्हणजे मूलकेंद्रित विचार करणे होय. चित्रकला, लेखन, क्रीडा, वक्तृत्व स्पर्धा, लेखन यात ज्या मुलांना रस आहे, त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

 • मुलांना सतत काही ना काही प्रश्‍न पडत असतात. त्यांची जिज्ञासा वाढली पाहिजे.

 • हल्ली पालक - शिक्षक संघटना असतात. मात्र, पालक-शिक्षक-विद्यार्थी असा त्रिकोण असायला हवा.

 • मुलांचे म्हणणे वा तक्रारी ऐकून घेण्यासाठी प्रत्येक शाळेत तक्रारपेटी हवी.

 • काळानुसार मुलं बदलत आहेत पण पालक मात्र बदलायला तयार नाहीत.

 • सध्याची मुलं खूप तंत्रस्नेही आहेत. संगणकापासून मोबाईलमधील विविध फीचर सहज हाताळतात. मात्र, याचा अतिरेक होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

मुलातलं मूलपण जपावं

एकनाथ आव्हाड

बालदिन साजरा करताना मुला-मुलींना सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे, हा विचार मनाच्या मुळाशी असावा. मुलांच्या विकासासाठी प्रत्येक पालकाने पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या कृतीतून ते झिरपताना दिसलं पाहिजे. मुले व पालकांमध्ये विश्‍वासाचं नातं निर्माण झालं पाहिजे तरच विकासाचे टप्पे सहजरीत्या पार करता येतात.

 • लहान मुलं ही अतिशय अनुकरणप्रिय असतात. या गोष्टीचा फायदा पालकांनी घ्यायला हवा.

 • मुलांना सध्या मुक्त संवादाची गरज आहे. बाकी काहीही मागा पण वेळ मागू नका, असं सांगणारे पालक मुलांच्या प्रगतीतील अडथळा ठरतात.

 • मुलांमध्ये नकारात्मकता वाढल्यास ती मैदानावर खेळायला न जाता मोबाइलवरच तहानभूक विसरून खेळत बसतात.

 • अनेकदा लहान मुलांना गृहीत धरलं जातं. त्यांना गप्प बसवलं जातं. तुला काय कळतंय? त्यांच्या कानीकपाळी असं बोललं जातं. यातून मुलं आत्मविश्वास हरवून बसतात.

 • मुलांशी सतत संवाद साधला पाहिजे. त्यांच्या मनातील शंकांचे निरसन केलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्या आवडी- निवडीही जोपासल्या पाहिजेत.

हेही वाचा: पुणे : निकृष्ट बेबी केअर कीट व खेळणी साहित्याचे वाटप

जग आणखी सुंदर करा

ज्योती कपिले

लहान मुलांना नेहमीच सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे. तसेच त्यांना आपले आयुष्य फुलवण्यात पालकांचा सहभाग असला पाहिजे. बालदिन हा फक्त एक दिवसाचा न राहता वर्षभर तो साजरा केला गेला पाहिजे. बालकांच्या मागण्या, गरजांचा पाठपुरावा झाला पाहिजे.

 • मुलांना निर्भयतेने जगता यावं, अशा वातावरणाची सध्या गरज आहे.

 • चाकोरीबाहेरचं जीवन मुलं जगू इच्छित असेल तर त्याला पालकांनी, शिक्षकांनी सहकार्य केलं पाहिजे.

 • मुलांनी वर्षभर अतिशय आनंदात व जल्लोषात घालवावे.

 • खेळा, फिरा, वाचा वा भटकंती करण्याबरोबरच आपली काळजी घेणे व जबाबदारीने वागणेही फार महत्त्वाचे आहे.

 • मुख्य म्हणजे कागद पेन जवळ करा, लिहिते व्हा, व्यक्त व्हा. तुमच्यातील कला जोपासा. हे जग सुंदर आहेच पण ते तुमच्या सहभागामुळे अजून सुंदर करा.

अनाथाश्रमात आनंदोत्सव

ईश्‍वरी नामदेव निकम, विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, पिंपरी, इयत्ता - पाचवी

बालदिनच काय पण वर्षभर मी मित्र-मैत्रिणींसमवेत धमाल करते. दरवर्षी मी वाढदिवस व बालदिन अनाथाश्रमात साजरी करत असते. त्याचबरोबर चौकात भीक मागणाऱ्या मुलांची मला खूप काळजी वाटते. त्यांना मी नियमितपणे खाऊवाटप करते. मला पुस्तक वाचनांबरोबरच नाट्यछटा व भाषण करण्याची खूप आवड आहे.

 • दरवर्षी आम्ही बालदिनी शाळेत खूप मजा करायचो. विविध स्पर्धांत भाग घ्यायचो.

 • कोरोनामुळे आॅनलाइन क्लास सुरू आहेत. त्यामुळे यंदाही शाळेसारखी मजा करता येणार नाही, याचं वाईट वाटतंय

 • दिवाकरांच्या नाट्यछटांची मला खूप आवड आहे. अनेक नाट्यछटा माझ्या तोंडपाठ आहेत.

 • माझ्या आवडीची गोष्टींची पुस्तके मला आई- बाबा आणून देतात. मी सगळी वाचून काढते व त्यातील गोष्टी मित्रमंडळींना सांगते.

 • छोटी छोटी मुले वेडी झाल्याचं पाहून मला खूप वाईट वाटतं. मोठ्यापणी मी अशा मुलांना बरे करण्यासाठी डॉक्टर होणार आहे.

loading image
go to top