‘ईव्हीएम’ची शंका? खात्री करा!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पुणे - ईव्हीएम (इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) मशिनबाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून डिसेंबरअखेर जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील मतदान केंद्रे, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये ईव्हीएम मशिनवर मतदानाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येईल. तसेच काही जणांना प्रत्यक्षात मतदान करून व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्याही मोजता येणार आहेत. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनबाबत काही जणांकडून शंका व्यक्‍त करण्यात येतात. काही राजकीय पक्षांनी ईव्हीएम मशिनऐवजी मतदानपत्रिकेचा वापर करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडे केले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने याबाबत मतदारांमध्ये जागृती करण्याचे काम सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन केले आहे. एका मतदारसंघात दोन मोबाईल व्हॅन, अशा प्रकारे पुणे शहर आणि जिल्ह्यात एकूण ४२ मोबाईल व्हॅन असतील. मतदान केंद्रे, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, आठवडी बाजार, झोपडपट्ट्यांमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनवर मतदानाचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येणार आहे.

मतदारांमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनबाबत जागृती व्हावी, यासाठी पुणे जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. डिसेंबरअखेरपासून पुढे एक महिनाभर ही मोहीम राबविण्यात येईल. यामुळे नागरिकांना मतदान प्रक्रियेची माहिती होईल. 
- मोनिका सिंह, उपजिल्हाधिकारी, निवडणूक शाखा

Web Title: EVM Machine Doubt