संभाजी भीडेंविरुध्द पुरावा उपलब्ध असून सरकारचे दुर्लक्ष - पृथ्वीराज चव्हाण

संतोष शेंडकर
शुक्रवार, 30 मार्च 2018

सोमेश्वरनगर - कोरेगाव भीमा दंगलीच्या वेळी संभाजी भीडे तिथे होते. त्याचा पुरावा उपलब्ध आहे. पण सरकार पुरावा गोळा करत नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच 'मुख्यमंत्र्यांनी चौकशी न होताच क्लिन चीट दिली याचा अर्थ काय?' असा सवालही उपस्थित करत मुख्यमंत्र्यांवरही शरसंधान केले आहे. 

सोमेश्वरनगर - कोरेगाव भीमा दंगलीच्या वेळी संभाजी भीडे तिथे होते. त्याचा पुरावा उपलब्ध आहे. पण सरकार पुरावा गोळा करत नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच 'मुख्यमंत्र्यांनी चौकशी न होताच क्लिन चीट दिली याचा अर्थ काय?' असा सवालही उपस्थित करत मुख्यमंत्र्यांवरही शरसंधान केले आहे. 

कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीप्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आलेली आहे. परंतु संभाजीराव भिडे यांना मात्र अटक करण्यात आलेली नाही. याबाबत भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नुकताच आझाद मैदानात मोर्चा पार पडला होता. यानंतर भिडे यांच्या समर्थनार्थही ठिकठिकाणी मोर्चे पार पडले. अशा वादग्रस्त प्रश्नात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भिडे गुरूजींचा कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकऱणाशी संबंध असल्याचा पुरावा नाही' असे सांगत एका अर्थी क्लिन चीट दिली होती. तर दुसरीकडे चौकशीही सुरू असल्याचे सांगितले होते.

विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा माजी मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. चौकशीआधीच क्लिन चीट देण्याच्या प्रकारावर त्यांनी नेमके बोट ठेवले. मुरूम (ता. बारामती) येथे ज्येष्ठ शेतीतज्ञ भीमराव शिंदे यांच्या निधान झाल्याने भेट देण्यासाठी चव्हाण आले होते. यावेळी 'सकाळ'शी बोलताना चव्हाण म्हणाले, अजून या प्रकरणी चौकशी सुरू आहे. चौकशी संपलेली नसतानाही मुख्यमंत्री क्लिन चीट देतात याचा अर्थ काय घ्यायचा? कोरेगाव भीमा हिंसाचार आपोआप झालेला नाही. तो घडवून आणलेला आहे. त्यामध्ये कुणाचा दोष आहे ते तपासलं पाहिजे. शनिवारवाड्यावर भाषणं झाली त्याचाही काही दोष आहे का तेही पाहिलं पाहिजे. सत्य परिस्थितीबाहेर येऊ द्या. त्याची प्रोसेस होऊद्या. भीडे गुरुजींविरूध्द पुरावे आहेत. परंतु सरकार ते गोळा करत नाही, असा आरोपही त्यांनी केला.

Web Title: Ex chief minister prithviraj chavhan said against sambhaji bhide