पिंपरी - ड्यूटीवर असताना मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकालाच सांगवी पोलिसांनी आरोपी केले. एवढेच नव्हे, तर प्रकरण मिटविण्यासाठी पैसेही घेतले. याप्रकरणी आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी माजी सैनिक असलेल्या सुरक्षा रक्षकाने पोलिस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अशोक किसनराव शिंदे असे या माजी सैनिकाचे नाव आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे, की १६ मार्च रोजी मद्यधुंद अवस्थेतील दोन व्यक्ती आपल्याकडे आल्या. त्यांनी मला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. तसेच, मारहाण केली. याबाबत १०० नंबरवर फोन केला. मात्र, एकही पोलिस घटनास्थळी आला नाही.
पोलिस चौकीत गेलो असता, पोलिसांनी तुमच्याविरोधात मारहाणीची फिर्याद आल्याचे सांगत वीस हजारांची मागणी केली. त्यापैकी मी दहा हजार रुपये दिले.
मध्यरात्री पोलिसांचा पुन्हा फोन आला व त्यांनी बोलावून घेतले. दिलेले पैसे परत केले. त्यानंतर १८ मार्च रोजी पोलिस उपनिरीक्षक एस. वाय. पाटील यांनी शिंदे यांनी संबंधित व्यक्तीची माफी मागण्यास भाग पाडले. त्यानंतर २३ मार्चला अटक केली व दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केले. याची चौकशी करून न्याय द्यावा.
शिंदे यांच्या विरोधात फिर्याद देणाऱ्या व्यक्तीला फ्रॅक्चर झाले असून, त्याबाबत गुन्हा दाखल आहे. शिंदे यांचीही तक्रार घेतलेली आहे. पोलिसांनी पैसे घेतले किंवा नाही, याबाबत चौकशीचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
- प्रभाकर शिंदे, वरिष्ठ निरीक्षक, सांगवी पोलिस ठाणे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.