दहा हजारांची लाच स्वीकारताना उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यास पकडले

प्रफुल्ल भंडारी
बुधवार, 9 मे 2018

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (ता. ९) दुपारी दौंड शहरातील नगर मोरी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात ही कारवाई केली. लाच प्रकरणी तक्रार देणाऱ्याची कार (मारूती एस एक्स फोर मॅाडेल) राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका कारवाईत जप्त केली होती.

दौंड (पुणे) - दौंड शहरातील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील सहायक दुय्यम निरीक्षक गोरख महादेव नील (वय ५४) व त्याच्या खासगी हस्तकास दहा हजार व ब्रॅंडेड टी शर्टची लाच घेताना पकडण्यात आले आहे. दारू विक्रीच्या प्रकरणात जप्त करण्यात आलेली एक कार सोडविण्यासाठी लाच स्वरूपात रोख दहा हजार व एका ब्रॅंडेड टी शर्टची मागणी करण्यात आली होती. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (ता. ९) दुपारी दौंड शहरातील नगर मोरी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात ही कारवाई केली. लाच प्रकरणी तक्रार देणाऱ्याची कार (मारूती एस एक्स फोर मॅाडेल) राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका कारवाईत जप्त केली होती. न्यायलयातून जप्त केलेली कार सोडण्याचे आदेश सदर केल्यानंतरही सदर कार सोडण्यासाठी सहायक दुय्यम निरीक्षक गोरख महादेव नील (वय ५४, रा. कळस, विश्रांतवाडी, पुणे) याने पंधरा हजार रूपये व दोन ब्रॅंडेड टी शर्टसची मागणी तक्रारदाराने केली होती. तडजोडीनंतर दहा हजार रूपयांत कार सोडण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे या बाबत तक्रार केली. त्यानंतर आज दुपारी पावणे दोन वाजता सापळा रचून राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात लाच स्वीकारताना गोरख महादेव नील व त्याचा खासगी हस्तक सिध्दलिंग वणाप्पा भंडारी (वय २८, रा. महादेव मंदिराजवळ, दौंड) यांना दहा हजार रूपये व एक ब्रॅंडेड टी शर्ट लाच स्वरूपात स्वीकारताना पकडण्यात आले.  

सहायक दुय्यम निरीक्षक गोरख नील यास लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने ताब्यात घेतल्याची माहिती मिळतात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय क्षणार्धात ओस पडले. या लाच प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या काही वरिष्ठांचा देखील सहभाग असल्याची शक्यता व्यक्त होत असून त्या दृष्टीने तपास केला जात आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक राजू चव्हाण, चंद्रकांत चौधरी, पोलिस हवालदार किरण चिमटे व प्रशांत बोराडे यांनी या कारवाईत भाग घेतला. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Excise Department officer arrested for taking bribe