Loksabha 2019 : उत्साह अन्‌ सेल्फीची क्रेझ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

पर्वतीत दुपारपर्यंत सर्वाधिक मतदान
शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी दुपारी एकपर्यंत सर्वाधिक मतदान म्हणजे २६. ९ टक्के मतदान पर्वतीमध्ये झाले होते. त्यापाठोपाठ पुणे कॅंटोन्मेंट, कसबा, शिवाजीनगर आणि वडगावशेरीचा समावेश होता. 

पुणे - मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले, तसेच नटूनथटून जाऊन मतदान करणारे उत्साही नागरिक, तर बूथमधील याद्यांनुसार मतदारांना आठवण करणारे कार्यकर्ते... मतदान केंद्रांसमोर वाहने लावण्यावरून होत असलेले नागरिकांचे आणि पोलिसांचे वाद, तर केंद्रांच्या आवारात सेल्फी काढणारे मतदार, असेच चित्र शहरातील बहुतांश मतदान केंद्रांवर मंगळवारी दिसत होते. कडक उन्हामुळे सकाळच्या पहिल्या टप्प्यात मतदानाचा जोर होता, तर दुपारी तो मंदावला आणि सायंकाळी चारनंतर पुन्हा तो वाढल्याचे दिसत होते. 

लोकसभा निवडणुकीसाठी शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांत मंगळवारी उत्साहात सकाळी सातला मतदान सुरू झाले. सायंकाळी सहापर्यंत अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. यंदा काही मतदान केंद्रांमध्ये बदल झाले होते. त्याची माहिती पोचली नसल्याचे काही मतदारांची तक्रार होती. काही ठिकाणी नावे वगळली गेली आणि नावे सापडत नाही, अशी तक्रारदेखील होतीच. मतदार शोधण्याची निवडणूक आयोगाची ‘लिंक’ व्हायरल झाली असल्यामुळे अनेक मतदार त्यांचे नाव शोधून, मतदान केंद्रांतील संबंधित खोलीपर्यंत पोचत असल्याचे दिसत होते. त्यामुळेच यंदा चौका-चौकांत मतदारांना त्यांच्या मतदार यादीतील क्रमांकाची माहिती देणाऱ्या राजकीय पक्षांच्या स्टॉल्सची संख्या घटल्याचे दिसून आले. मतदानाला जाताना घरातील ज्येष्ठ नागरिकांना आवर्जून घेऊन जाणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी दिसत होती. महिलांबरोबरच युवा आणि नवमतदारांचाही मतदानासाठी उत्साह होता. 

मॉर्निंग वॉक आटोपून मतदान करूनच घरी परतणारेही अनेक जण दिसत होते. सकाळी सात ते अकरापर्यंत मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडत असल्याचे मार्केट यार्ड, बिबवेवाडी, सहकारनगर, पद्मावती, धनकवडी, सिंहगड रस्ता, मॉडेल कॉलनी, नारायण- शनिवार- सदाशिव पेठ, नवी पेठ, शास्त्रीनगर, परमहंसनगर, भुसारी कॉलनी, बावधन, औंध, वाकडेवाडी, नारंगीबाग, कोरेगाव पार्क, नाना- भवानी पेठ, वानवडी, डीएड कॉलनी आदी भागांतील मतदान केंद्रांवर दिसून आले. ताडीवाला रस्ता, जनता वसाहत, आंबीलओढा, पाटील इस्टेट, तळजाई परिसर, बिबवेवाडी ओटा, आंबेडकरनगर, हरकानगर आदी परिसरातील मतदान केंद्रांवरही सकाळपासूनच गर्दी झाली होती. दुपारी बारानंतर गर्दी काहीशी कमी झाली. तोपर्यंत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे कोणत्या भागातून किती मतदार आले, किती राहिले, कोणाला आठवण केली आदींचे हिशेब सुरू झाले होते आणि त्यानुसार पाठपुरावा करण्यासाठी त्यांची यंत्रणा सज्ज झाली.  शहरातील मतदान केंद्राबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. 

‘खडकवासला’मध्ये उत्साह 
बारामती लोकसभा मतदारसंघातही मंगळवारी मतदान झाले. या मतदारसंघाला खडकवासला विधानसभा मतदारसंघ जोडण्यात आला आहे. त्यातील धनकवडी, कात्रज, आंबेगाव, सिंहगड रस्ता, धायरी, शिवणे, वारजे, बावधनमध्येही सकाळपासूनच मतदारांचा उत्साह होता. सोसायट्यांमधील मतदार सकाळीच मतदानाला निघाल्याचे दृश्‍य होते, तर वस्ती भागातूनही सकाळी दुपारी तीननंतर मतदान वाढल्याचे दिसत होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने बारामतीची लढत प्रतिष्ठेची केली असल्यामुळे दोन्ही पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची फौज मतदारांपर्यंत पोचून त्यांनी अनुकूल मतदान करावे, यासाठी निकाराचे प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. 

कुटुंब रंगलंय ‘सेल्फी’त
मतदान करून केंद्राबाहेर पडणारे अनेक पुणेकर कुटुंबीय मोबाईलवरून सेल्फी घेत होते. ही सेल्फी लगेचच फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्‌विटर आदी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत होती. मतदारांबरोबरच राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही या सेल्फीमध्ये दंग असल्याचे दिसत होते. 

पर्वतीत दुपारपर्यंत सर्वाधिक मतदान
शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी दुपारी एकपर्यंत सर्वाधिक मतदान म्हणजे २६. ९ टक्के मतदान पर्वतीमध्ये झाले होते. त्यापाठोपाठ पुणे कॅंटोन्मेंट, कसबा, शिवाजीनगर आणि वडगावशेरीचा समावेश होता. 

उमेदवारांचे कुटुंबीयांसह मतदान
भाजप युतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी कुटुंबीयांसमवेत शनिवार पेठेत अहिल्यादेवी शाळेत मतदान केले, तर काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनीही कुटुंबीयांसह सॅलिसबरी पार्कमधील मॅकन्हेरी शाळेत सकाळीच मतदान केले. त्यानंतर दोन्ही उमेदवारांनी शहरातील विविध भागांतील मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदार, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

Web Title: Excitement and selfie craze in the Pune Lok Sabha elections