Loksabha 2019 : मतदानाचा उत्साह अन्‌ राजकारण्यांकडून अपेक्षा

मीनाक्षी गुरव
बुधवार, 24 एप्रिल 2019

 ‘‘देशाचा विकास व्हावा, देशात शांतता असावी, असे वाटते. त्याचबरोबर जातीय राजकारण नको. जात आणि धर्म या नावाने तेढ नको,’’ अशी अत्यंत कळकळीने मते मांडत मुस्लिम समाजातील महिलांनी बोलक्‍या भावना व्यक्त केल्या. मतदानाच्या निमित्ताने या महिला बोलत होत्या.

पुणे -  ‘‘देशाचा विकास व्हावा, देशात शांतता असावी, असे वाटते. त्याचबरोबर जातीय राजकारण नको. जात आणि धर्म या नावाने तेढ नको,’’ अशी अत्यंत कळकळीने मते मांडत मुस्लिम समाजातील महिलांनी बोलक्‍या भावना व्यक्त केल्या. मतदानाच्या निमित्ताने या महिला बोलत होत्या.

शहरात विविध ठिकाणी भेट देताना, निवडणुकीदरम्यान झालेले आरोप-प्रत्यारोपात नागरिकांना रस नसल्याचे प्रकर्षाने जाणवले, तर विकासाच्या मुद्द्यावर मग तो स्थानिक, राज्य आणि देश पातळीवरील असो त्यावर चांगले काम झाले पाहिजे. शिक्षण, रोजगार, महिलांची सुरक्षितता, प्रदूषण यांसह अगदी पाणी, रस्ते, मेट्रो अशा विषयावर निवडून येणाऱ्या खासदाराने काम करायला हवे, अशी अपेक्षा बाळगत मतदान केल्याचे नागरिक आवर्जून सांगत होते.

कासेवाडी परिसरातील हाजी गुलाम मोहम्मद आझम उर्दू प्राथमिक शाळा आणि आझम कॅम्पसमधील मतदान केंद्रात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने मतदानासाठी येत होते. मुलींच्या सुरक्षिततेच्या प्रश्‍नाबरोबरच तरुणांमधील बेरोजगारी, मुलींचे उच्च शिक्षण अशा विषयावर मते या परिसरातून मांडली जात होती. विशेष म्हणजे ‘जातीय तेढ नको’, ‘मतभेद नको’, ‘स्त्री-पुरुष समानता हवी आहे,’ यासाठी प्रयत्न व्हावेत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा पेठ आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघात मंगळवारी विविध ठिकाणी भेटी दिल्या असता, नागरिकांनी मोकळेपणाने भावना व्यक्त केल्या. सकाळी मतदानासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या उन्हाच्या कडाक्‍याने दुपारी ओसरेल, असे वाटले. परंतु कोथरूड, माणिकबाग, बिबवेवाडी, आझम कॅम्पस परिसरात रणरणत्या उन्हातही मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याचे चित्र दिसून आले.

मतदान केंद्रांवर सुविधा
औंधमधील इंदिरा मॉडेल स्कूलमध्ये सकाळी साडेसातच्या सुमारास प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. एरवी एखादा सांस्कृतिक कार्यक्रम किंवा प्रचार सभा असेल, तर वाहनतळावर गाड्यांच्या रांगा पाहायला मिळतात; परंतु येथे मतदानासाठी वाहनतळ ‘फुल’ झाले होते. प्रत्यक्ष मतदान केंद्रात तीनशे ते चारशे नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. सहकार्यासाठी केंद्रातील कर्मचारी तत्पर असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले. खरंतर प्रत्येक मतदान केंद्रावर किमान एक तरी व्हीलचेअर होती. शिवाय ज्येष्ठ नागरिक आले, की त्याची आपुलकीने चौकशी करीत त्याला सहकार्य करण्यात येत असल्याचे आश्‍वासक चित्र होते.

लक्षवेधक सखी मतदान केंद्र
मॉडेल कॉलनीतील विद्या भवन शाळेत सखी मतदान केंद्र हे वैशिष्ट्य ठरले. यात महिला कर्मचारी होत्या. रांगोळी काढून ‘मतदार राजा’चे स्वागत करण्यात आले. पौड रस्ता येथील विजयमाला कदम कन्या प्रशालेत सत्तरीत असलेल्या शांताबाई फाटक आजी भेटल्या. घरकामाला जाण्यापूर्वी त्यांनी मतदानाचा हक्क बजाविला. सदाशिव पेठेतील नव्वदी पार केलेल्या सुनंदा हावळ या आजींनीही मतदानाचे कर्तव्य बजाविण्यासाठी सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील केंद्रावर हजेरी लावली. बिबवेवाडीतील कै. चिंतामणराव देशमुख उर्दू प्राथमिक विद्यालय आणि न्यू मिलेनियम शाळा येथे ऐन दुपारीही मोठ्या प्रमाणात मतदारांची गर्दी पाहायला मिळाली.

Web Title: The Excitement of voting and expectations from politicians