पुणे : मुजुमदारवाडा वारसा यादीतून वगळा

पुणे : मुजुमदारवाडा वारसा यादीतून वगळा

पुणे - कसबा पेठेतील ऐतिहासिक सरदार मुजुमदारवाड्याला निर्माण झालेला धोका दूर करण्यासाठी महापालिका, पालकमंत्री आणि खासदारांकडे पाठपुरावा करूनही उपाययोजना होत नसल्यामुळे या वाड्याचा ‘वारसा दर्जा’ (हेरिटेज) यादीतून वगळण्यात यावा, अशी मागणी मुजुमदार कुटुंबीयांनी महापालिकेकडे गुरुवारी केली.

ऐतिहासिक वास्तू म्हणून महापालिकेने हा वाडा घोषित केला असून, त्याबाबत उपाययोजना करण्याच्या सहा महिन्यांपूर्वी केलेल्या घोषणांना महापालिकेने हरताळ फासला आहे. मुजुमदारवाड्याची कैफियत ‘सकाळ’ने २२ एप्रिल रोजी मांडली होती. सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या नातसून अनुपमा मुजुमदार सध्या तेथे पतीसमवेत राहतात. त्या म्हणाल्या, ‘‘वाड्याशेजारील बेकायदा बांधकाम पाडत असताना मुजुमदारवाड्याला धोका निर्माण झाला आहे. या वाड्याची एक भिंत कोसळली आहे, तर काही भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे. वाड्याच्या काही खोल्या एका बाजूने झुकल्या आहेत. त्याला सध्या लोखंडी खांबांचा आधार दिला आहे. याबाबत उपाययोजना करण्याचे आश्‍वासन महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिले होते. परंतु, सहा महिने उलटले तरी त्याबाबत काहीही प्रगती झालेली नाही.’’ सुमारे शंभर खोल्यांच्या या वाड्यात पेशवेकालीन वस्तूंचे संग्रहालय आहे. त्यात पेशवेकालीन अवजारे, चलन, भांडी, वस्त्रे, वाद्ये अशा बऱ्याच वस्तू जपल्या आहेत. 

शनिवारवाड्याच्या परिसरात १०० मीटर अंतरावर बांधकाम करण्यास बंदी असून, दुरुस्ती करता येऊ शकते. परंतु, वाड्याच्या परिसरात अनेक ठिकाणी सर्रास बांधकामे सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले. याबाबत महापालिकेत बांधकाम विभाग, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे पाठपुरावा केला; परंतु अद्याप मदत झालेली नाही. खासदार सुप्रिया सुळे यांनीही आमची बाजू महापालिकेत मांडली. परंतु, पुढे काही कार्यवाही झाली नाही. आमची आर्थिक परिस्थिती बिकट असूनही आम्हाला हा खर्च करावा लागतो. हा वाडा ‘हेरिटेज’ असेल तर निदान करात तरी सूट मिळावी, अशी मागणी मुजुमदार यांनी केली आहे.

वाड्याच्या मागच्या बाजूस अनधिकृत बांधकाम होतं, ते महापालिकेने काढलं आहे. महापालिका त्या परिसरात दुरुस्ती करायला परवानगी देऊ शकते; पण बांधकाम करायला परवानगी देऊ शकत नाही. वाड्याच्या आजूबाजूला राहणारे रहिवासी हे खूप आधीपासून तिथे राहतात. पैकी शंभर मीटरच्या हद्दीत येणाऱ्या रहिवाशांना महापालिकेने नोटिसा पाठवल्या आहेत. मात्र नियमानुसार महापालिका वाड्यासाठी आर्थिक मदत करू शकत नाही. त्यासाठी वाड्यातील कुटुंबाने पुरातत्त्व विभागाकडे जावे. वाड्याचा हेरिटेज दर्जा मात्र महापालिका काढणार नाही.
- मुक्ता टिळक, महापौर 

दुरुस्ती सोडा पालिकेकडून मार्गदर्शनही नाही
मुजुमदार म्हणाल्या, ‘‘महापालिकेच्या म्हणण्यानुसार, हा वाडा खासगी असल्यामुळे डागडुजीसाठी महापालिका निधी देऊ शकत नाही. महापालिकेच्या ऐतिहासिक वास्तू विभागाकडून वाड्याची डागडुजी आणि जीर्ण झालेला भाग पुनर्बांधणीसाठी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन होऊ शकते. ऐतिहासिक वास्तू जतन करण्याच्या परवानग्या तेवढ्या महापालिकेच्यावतीने दिल्या जातात. परंतु, महापालिकेने मार्गदर्शनही केलेले नाही. ’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com