सरकारला हद्दपार करा - सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

वाल्हे - ‘‘शिवसेना-भाजपने जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्ता काबीज केली. सत्तेवर येताच त्यांना आश्वासनांचा विसर पडला. गेल्या तीन वर्षांत शेतकरीविरोधी धोरणे राबवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम या सरकारने केले आहे. शेतकऱ्यांचा आवाज ऐकायलाही सरकार तयार नाही. अशा झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला सत्तेतून हद्दपार करा,’’ असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

मांडकी व जेऊर (ता. पुरंदर) येथे सुळे यांच्या गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, विश्वास जगताप, सरपंच सतीश जगताप, उत्तम धुमाळ, सरपंच जनार्दन तांबे, आनंदा जाधव, लालासाहेब तांबे, घनश्‍याम तांबे, आनंता तांबे, श्‍यामराव धुमाळ, महेश साळुंखे आदी उपस्थित होते. सुळे म्हणाल्या, ‘‘पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मोठी कामे उभी राहिली आहेत. गट-तट न पाहता विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’’

मांडकीच्या ग्रामस्थांनी जेऊर फाटा ते तोंडल हा २२ किलोमीटर लांबीचा रस्ता करण्याची मागणी केली. त्यानंतर सुळे यांनी निवडणुकीपूर्वी रस्ता मंजूर करण्याबाबत ग्रामस्थांना आश्वासन दिले.

सोमेश्वर कारखान्याचे संचालक मोहन जगताप यांनी प्रास्ताविक, महेंद्र साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. विजय जगताप यांनी आभार मानले.

‘आई जेवू घालेना आणि...’ 
मांडकीला येत असताना सुप्रिया सुळे यांना एका ठिकाणी शेतकरी दांपत्य कांद्याची प्रतवारी करताना दिसले. गाड्यांचा ताफा थांबवून सुळे यांनी लक्ष्मण जगताप व छाया जगताप या शेतकरी दांपत्याची विचारपूस करत शेतीमालास मिळणाऱ्या भावाबाबत चर्चा केली. त्या वेळी जगताप दांपत्य म्हणाले, की उन्हातान्हात राबून पीक आणले आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. त्याच्याआधी कांदा बाजारात पोचविणे गरजेचे आहे. मात्र, कांदा मार्केटला जाईपर्यंत त्याला किती भाव मिळेल, याचेच टेन्शन लागून राहिलंय. या सरकारमुळे शेतकऱ्यांची अवस्था ‘आई जेवू घालेना आणि बाप भीक मागू देईना’ अशी झाली आहे. 

Web Title: Execute the government says supriya sule