Video : चिमुकल्या आगपेट्यांची साकारली अजब नगरी 

exhibition of matchbox show pieces in Pune
exhibition of matchbox show pieces in Pune

पुणे : इटुकल्या पिटुकल्या आगपेट्यांची अजब नगरी आजपासून बालगंधर्व कलादालनात अवतरली आहे. मानव जेव्हा दगडावर दगड घासून ठिणगी निर्माण करायचा, तेव्हापासून ते आजच्या निरनिराळ्या आगपेट्यांपर्यंत विविध प्रकारचे नमुने येथे बघायला मिळतात. लहानमोठे सगळेच या प्रदर्शनात आगपेट्यांचा इतिहास जाणून घेण्यात रमत आहेत. हे प्रदर्शन येत्या शनिवारपर्यंत सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेत विनामूल्य पाहता येईल. 

आधुनिक आगपेट्यांचा सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास समजून घ्यायची संधी विनायक ऊर्फ जयंत जोशी यांच्या अनोख्या छंदामुळे उपलब्ध झाली आहे. छोट्या गावातली पानाची टपरी ते महानगरीतील पंचतारांकित हॉटेल, अशी सर्वत्र हमखास हजेरी लावणारी वस्तू म्हणजे चिमुकली आगपेटी. किती तऱ्हांनी ही तयार होते, तिच्यात कसे बदल घडून आले, याची साक्ष म्हणजे या प्रदर्शनातील वेगवेगळ्या रूपातील आगपेट्या. छोट्या, मध्यम आकाराच्या आगपेट्यांबरोबरच त्यांतील काड्यांपासून बनवलेल्या आकर्षक कलाकृतीही आश्‍चर्यचकित करतात. आयताकृती, चौकोनी, चिंचोळ्या आगपेट्या पाहताना त्यांच्या आवरणावरील नटनट्या, प्राणी, फळे, अंक आदी चित्ररूपात दिसतात. भारतीयबरोबरच परदेशी ब्रॅंडच्या आगपेट्यांवरून नजर भिरभिरत राहते. 

सुरक्षित आगपेट्यांचा शोध लावणारा गुस्ताफ एरिक पाश, फॉस्फरसयुक्त आगपेट्यांचा जनक चार्ल्स सॉरिया, घर्षणाने काड्या पेटण्यासंदर्भात मौलिक कामगिरी करणारा जॉन वॉकर, आगपेट्या निर्मितीची प्रक्रिया यांसारखी महत्त्वाची माहिती येथील भित्तीपत्रकांवरून मिळते. फक्त एवढेच नव्हे, तर आगपेट्यांच्या पॅकिंगसाठी वापरले जाणारे वैशिष्ट्यपूर्ण कागद, खोकी व हे सारे ठेवण्यासाठीच्या पिशव्या बघायला मिळतात. 

बाटल्या उघडणारे "ओपनर'ही 
बाटल्या उघडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांचे (बॉटल ओपनर) स्वतंत्र दालन या प्रदर्शनात आहे. त्यांपैकी काही नमुने बघताना तर, "याने कशी काय बाटली उघडत असेल,' असा प्रश्न पडतो. या प्रकारच्या छंदांमधून एखाद्या विषयाची सखोल माहिती करून घेण्यासाठी मदत होते, हे प्रेक्षकांच्या मनावर ठसावे, अशी मांडणी करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com