राजा रवी वर्मांच्या दुर्मीळ मुद्राचित्रांचे प्रदर्शन 

राजा रवी वर्मांच्या दुर्मीळ मुद्राचित्रांचे प्रदर्शन 

पुणे - "अ ट्रिब्युट टू राजा रवी वर्मा' या चित्रप्रदर्शनात भारतीय चित्रकलेला जागतिक ओळख देणारे चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या दुर्मीळ कलाकृती पाहण्याची संधी चित्ररसिकांना मिळणार आहे. 

पु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्ह आणि झपूर्झा-क्रिएटिव्ह हबच्या सहकार्याने होणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्‌घाटन बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात शुक्रवारी (ता. 26) सायंकाळी पाच वाजता होणार आहे. पुढील बुधवारपर्यंत (ता. 31) सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल. 

झपूर्झा-क्रिएटिव्ह हबचे संस्थापक अजित गाडगीळ म्हणाले, आजच्या पिढीला राजा रवी वर्मा यांनी निर्माण केलेल्या कला वारशांची ओळख व्हावी, या हेतूने हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. राजा रवी वर्मांची आणि रवी वर्मा प्रेसची रामायण, महाभारत, पौराणिक कथा व विविध देवी-देवतांची शंभरहून अधिक मुद्राचित्रे मांडली जातील. तसेच, त्यांच्या चित्रांवर आधारित काडेपेटीचे छाप, निरनिराळी लेबल्स, मूर्ती, कॅलेंडर्स यांचाही समावेश असेल. चित्रकार म. वि. धुरंधर, माळी यांचीही मुद्राचित्रे येथे असतील. 

रवी वर्मा यांनी जानेवारी 1888 मध्ये जर्मनीतून प्रिंटिंग प्रेस आणि तंत्रज्ञ बोलावून मुंबईत गिरगाव येथे रवी वर्मा प्रेसची स्थापना केली. "बर्थ ऑफ शकुंतला' (शकुंतला जन्म) हे त्यांनी छापलेले पहिले चित्रही यात पाहायला मिळणार आहे, असे क्‍युरेटर विक्रम मराठे यांनी सांगितले. 

दुर्मीळ लिथोग्राफचे मोठे कलेक्‍शन 
या प्रदर्शनात लिथोग्राफी तंत्राची माहिती दिली जाईल. तसेच, पुण्यात 1888 मध्ये छापलेला दुर्मीळ लिथोग्राफ व लिथोग्राफीची शिळा आणि रवी वर्मांच्या संदर्भातील छायाचित्रेही प्रदर्शनात असतील. शनिवार (ता. 27) व रविवारी (ता. 28) अजय देशपांडे, आदित्य शिर्के हे व्यक्तिचित्रांचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत, असे मुख्य क्‍युरेटर दिलीप जोशी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com