अभ्यासिका चोवीस तास खुली करा! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थिंनीना अधिकाधिक सुरक्षित वाटेल, अशा सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच नवीन कुलगुरूंनी विद्यार्थ्यांसाठी जयकर ग्रंथालयाची अभ्यासिका 24 तास खुली करून द्यावी, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. 

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थिंनीना अधिकाधिक सुरक्षित वाटेल, अशा सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच नवीन कुलगुरूंनी विद्यार्थ्यांसाठी जयकर ग्रंथालयाची अभ्यासिका 24 तास खुली करून द्यावी, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. 

विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आज प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या नव्या कुलगुरूंकडून अपेक्षा काय आहेत, हे "सकाळ'ने जाणून घेतले. विद्यापीठातील परिसर भयमुक्‍त आणि कोणत्याही संघटनांकडून विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, असा राखावा. खाणावळीच्या दर्जामध्ये सातत्य ठेवावे, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या. 

राजकीय संघटनांना थारा नका 
सोमनाथ लोहार म्हणाले, ""विद्यापीठ हे विद्यार्थिभिमुख ठेवावे. कोणत्याही राजकीय वा जातीयवादी संघटनांना नव्या कुलगुरूंनी पाठबळ देऊ नये. विद्यार्थिनींना रात्री मुख्य प्रवेशद्वारापर्यंत सोडण्याची सुविधा आहे. खानावळीचा (रिफेक्‍टरी) नवा करार झाल्याने सध्या तरी जेवणाचा दर्जा चांगला आहे. ज्या चांगल्या सुविधा दिल्या जातात. त्यात कायम ठेवाव्यात.'' मुलींच्या मनात असुरक्षिततेची भावना असतेच. त्यांना अधिक सुरक्षित वाटेल, अशी काही व्यवस्था करावी, अशी अपेक्षा मनीषा निरपळ आणि कविता पारसकर यांनी व्यक्त केली. 

विद्यापीठाला राष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. त्याची प्रगती आणखी व्हावी. त्याबरोबर विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, असे सांगताना बालाजी निवळीकर म्हणाला, ""सध्या विद्यापीठातील विद्यार्थी संशोधनाबरोबर एमपीएससी, यूपीएससीचा अभ्यास करतात. सध्या त्यांना सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत अभ्यासिका उपलब्ध असते. परंतु ही अभ्यासिका चोवीस तास उपलब्ध करून दिली, तर त्याचा फायदा होईल. अभ्यासिकेचे किमान दोन मजले, तरी चोवीस तास उपलब्ध करून द्यावेत.'' 

विद्यार्थ्यांना खानावळ चालवायला द्यावी 
प्रवीण राऊत म्हणाला, ""विद्यापीठातील खाणावळीच्या दर्जाचा नेहमी प्रश्‍न निर्माण होतो. सध्या कंत्राटदार बदलल्याने दर्जा चांगला आहे. तो कायम राहिला पाहिजे. त्यासाठी ही खाणावळ विद्यार्थ्यांनाच चालवायला द्यावी. कमवा आणि शिका योजनेत काम करणारे विद्यार्थी हे काम करू शकतात. यामुळे जेवणाचा दर्जा राखला जाईल आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारीदेखील होणार नाहीत.'' 

Web Title: Expect students from Dr. Nitin Karmalkar