डॉन ब्रॅडमन यांना भेटल्याची अनुभूती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

पुणे - ‘‘क्रिकेटच्या विश्‍वातील भीष्म पितामह अशी ओळख असणाऱ्या सर डॉन ब्रॅडमन यांच्या ९० व्या वाढदिवसाला त्यांना भेटायला ऑस्ट्रेलियामध्ये गेलो होतो. त्या वेळी मनात दाटून आलेल्या भावनांसारखीच अनुभूती पु. ल. देशपांडे यांच्या निवासस्थानी पाऊल ठेवताना आली, अशा शब्दांत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आपल्या भावना व्यक्त केल्या. सचिनने पहिल्यांदाच ‘पुलं’च्या निवासस्थानाला शुक्रवारी भेट दिली. दोन्ही परिवारातील ऋणानुबंधही त्याने या वेळी उलगडले.

पुणे - ‘‘क्रिकेटच्या विश्‍वातील भीष्म पितामह अशी ओळख असणाऱ्या सर डॉन ब्रॅडमन यांच्या ९० व्या वाढदिवसाला त्यांना भेटायला ऑस्ट्रेलियामध्ये गेलो होतो. त्या वेळी मनात दाटून आलेल्या भावनांसारखीच अनुभूती पु. ल. देशपांडे यांच्या निवासस्थानी पाऊल ठेवताना आली, अशा शब्दांत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आपल्या भावना व्यक्त केल्या. सचिनने पहिल्यांदाच ‘पुलं’च्या निवासस्थानाला शुक्रवारी भेट दिली. दोन्ही परिवारातील ऋणानुबंधही त्याने या वेळी उलगडले.

आशय सांस्कृतिकच्या वतीने पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘ग्लोबल पुलोत्सव’ आयोजित केला आहे. ‘पुलोत्सवा’च्या पूर्वसंध्येला सचिनने भांडारकर रस्त्यावरील ‘मालती माधव’ अपार्टमेंटमधील ‘पुलं’च्या निवासस्थानी भेट दिली. ‘पुलं’च्या कुटुंबीयांनी सचिनला घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यांच्या आमंत्रणाचा मान राखत तो स्वत: चारचाकी गाडी चालवत आला होता. यानिमित्त त्याने पहिल्यांदाच पुलंच्या घरी पाऊल ठेवले. या वेळी ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, ‘पुलं’चे नातेवाईक ज्योती ठाकूर, दिनेश ठाकूर, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार आदी उपस्थित होते. ‘पुलोत्सवा’निमित्त आयोजित ‘आय लव्ह पीएल’ या मोहिमेच्या बोधचिन्हाचे आणि महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशनही सचिनच्या हस्ते झाले.

एरवी मनाने कायम मैदानात असणारा सचिन पुलमय वातावरणात चांगलाच रमला. ‘‘माझे बाबा आणि पु. ल. देशपांडे हे चांगले मित्र होते. त्यामुळे त्यांची पत्रे बाबांना येत. त्यातील अनेक पत्रे बाबांनी मला दाखविली आहेत. ‘पुलं’ना मी पहिल्यांदा वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षी बांद्य्रामध्ये पाहिले. ते आमच्या सोसायटीत आले होते. त्या वेळी मीही रांगेत उभा राहून त्यांची स्वाक्षरी घेतली. घरी त्यांच्याविषयी नेहमी ऐकायचो, तेव्हा चेहरा नेहमी हास्याने खुलायचा,’’ अशा आठवणी सचिनने सांगितल्या.

सर्वसामान्य माणसाशी पु. ल. देशपांडे सहज कनेक्‍ट होत असत. कोणताही कलाकार हा त्याच्या क्षेत्रात प्रगती करत असतो. पण सर्वसामान्य माणसाशी कनेक्‍ट होणे ही एक दैवी देणगीच असते. आपल्या कलेच्या सादरीकरणाद्वारे माणसांना आनंद देणे हे ‘पुलं’ना नैसर्गिकरीत्या जमत होते. आपल्या पिढीने तो आनंद घेतला आहे. परंतु आताची पिढी डिजिटल असून, या पिढीने ही संधी गमावू नये, असे वाटते.
- सचिन तेंडुलकर

पु. ल. आणि माझ्यातही एक साम्य
‘‘पु. ल. आणि माझ्यात एक साम्य होते. आम्हा दोघांना ‘सी फूड’ खूप आवडते. १९९६ मध्ये शिवाजी पार्कमध्ये मी बाबा, आई यांच्यासमवेत जेवायला गेलो होतो, त्या वेळी त्यांची भेट झाली. तेव्हा त्यांनी मला एक फ्रेम भेट दिली होती. तो क्षण आजही मला पुन्हा एकदा ‘फ्रेम’च्या रुपात अनुभवायला मिळाला, असेही सचिनने सांगितले. या वेळी ‘पुलं’च्या परिवारातर्फे त्या क्षणाच्या छायाचित्राची फ्रेम सचिनला भेट म्हणून देण्यात आली.

Web Title: An experience of seeing Don Bradman