तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या निवडीचा प्रस्ताव पाच महिने प्रलंबित 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

पुणे  - महापालिकेच्या रुग्णालयांत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणारा सत्ताधारी भाजप तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या निवडीच्या प्रस्तावाला मंजुरी देऊ शकला नाही. महिला बाल कल्याण समितीपुढे हा प्रस्ताव मंजुरीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून प्रलंबित आहे. 

पुणे  - महापालिकेच्या रुग्णालयांत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणारा सत्ताधारी भाजप तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या निवडीच्या प्रस्तावाला मंजुरी देऊ शकला नाही. महिला बाल कल्याण समितीपुढे हा प्रस्ताव मंजुरीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून प्रलंबित आहे. 

महापालिकेने नुकतेच सोनवणे रुग्णालय, राजीव गांधी रुग्णालय येथे नवजात शिशू अतिदक्षता विभाग सुरू केला. त्याचे उद्‌घाटनही झाले. एकीकडे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न दिसत असताना आवश्‍यक डॉक्‍टरांच्या नियुक्तीला विलंब होत असल्याचे स्पष्ट होत आहे. महापालिकेच्या रुग्णालयांत त्वचारोगतज्ज्ञ, नोडल ऑफिसर, वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी, हृदयरोगतज्ज्ञ, न्यायवैद्यक अधिकारी, नेत्र शल्यचिकित्सक, रक्तसंक्रमण अधिकारी ही पदे सरळसेवेने भरण्यासाठी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रक्रिया झाली. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार 113 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी दोन जण आवश्‍यक कागदपत्रे देऊ शकले नाहीत. उर्वरित उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली तसेच तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या पॅनेलने त्यांच्या मुलाखतीही घेतल्या. त्यानंतर सात उमेदवारांची निवड करण्यात आली. हे सात जण विहित मुदतीत हजर न झाल्यास प्रतीक्षा यादी तयार केली. ही सर्व प्रक्रिया गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पूर्ण झाली. महापालिका आयुक्तांनी या निवडीला मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव जानेवारी महिन्यात महिला बाल कल्याण समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. या समितीवर भाजपचेच वर्चस्व असूनही या प्रस्तावावर गेल्या पाच महिन्यांत निर्णय झाला नाही. 

Web Title: Expert doctor's choice is pending for five months