जगभ्रमंतीनंतर तेवीस वर्षांनी ‘ते’ पुन्हा सज्ज!

स्वप्नील जोगी
रविवार, 9 एप्रिल 2017

दीपक कामत थरारक मोहिमेवर; यंदा पहिल्यांदाच तंत्रज्ञानाचा उपयोग

पुणे - एनसीसीचे कॅडेट असताना वयाच्या अठराव्या वर्षीच ज्यांनी आपली मुशाफिरी सुरू केली, असे ‘बाइकर’ दीपक कामत आठवताहेत?... हो, तेच दीपक कामत, ‘बाइकिंग’ किंवा ‘मोटारसायकलिंग’ या ‘ॲडव्हेंचर स्पोर्टस’मध्ये भारताचं नाव जागतिक पटलावर नेलेला अवलिया. 

दीपक कामत थरारक मोहिमेवर; यंदा पहिल्यांदाच तंत्रज्ञानाचा उपयोग

पुणे - एनसीसीचे कॅडेट असताना वयाच्या अठराव्या वर्षीच ज्यांनी आपली मुशाफिरी सुरू केली, असे ‘बाइकर’ दीपक कामत आठवताहेत?... हो, तेच दीपक कामत, ‘बाइकिंग’ किंवा ‘मोटारसायकलिंग’ या ‘ॲडव्हेंचर स्पोर्टस’मध्ये भारताचं नाव जागतिक पटलावर नेलेला अवलिया. 

नव्वदच्या दशकात (१९९४) जावा येझडी या दुचाकीवरून जगाला वळसा घालून परतला होता हा माणूस. दुचाकीवरून ‘राउंड द वर्ल्ड’ करण्याचा हा जगातला पहिलाच साहसी प्रयत्न होता. तेच कामत आता एका नव्या थरारक साहसासाठी पुन्हा सज्ज झाले आहेत... पुण्यात आलेल्या कामत यांच्याशी ‘सकाळ’ने साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी आपल्या नव्या मोहिमेसोबतच एकूणच बाइकिंग क्षेत्रातल्या स्थित्यंतरांबाबतही मतं मांडली.

आज कामतांच्या विश्‍वविक्रमाला तब्बल २३ वर्षं उलटली. कामत तेव्हा त्यांच्या विशीत होते. आज ते पन्नाशीकडे वाटचाल करताहेत. पण त्यांचा उत्साह आणि जिद्द मात्र विशीतल्यासारखीच आहे. म्हणूनच की काय, पण येत्या जूनमध्ये जगातील काही अतिदुर्गम आणि आव्हानात्मक ठिकाणं दुचाकीवरून सर करायला ते सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे, ही नवी मोहीम फत्ते केल्यास असं करणारे ते पहिलेच भारतीय ठरणार आहेत! ‘‘मागे वळून पाहतो तेव्हा मला कसलंही असमाधान जाणवत नाही. मी खूप खूश आहे. आयुष्यात सारं सारं काही  मिळाल्याचं समाधान आहे मला! मला वाटतं, एनसीसीच्या काळात मला जेवढं काही शिकता आलं, त्यातूनच मी घडत गेलो...,’’ एकेकाळी सायकलीवरून भारतभ्रमंती केलेले आणि पुढे आपल्या ‘बाइक’भ्रमंतीने जगभरात अनेकांचे आयडॉल ठरलेले कामत भरभरून बोलत होते. वर्ल्ड एक्‍सपिडिशनसाठी मित्र आणि कुटुंबीयांनी दिलेलं पाठबळ हेच खरंखुरं ‘ड्रायव्हिंग फोर्स’ ठरलं. सुरवातीला छंद म्हणून आणि पुढील काळात करिअर म्हणूनही बाइकिंगकडे पाहता येऊ शकेल, असं त्यांनी या क्षेत्रात येणाऱ्यांना सांगितलं.

पुढील मोहिमांसाठी उपयोगी!
कामत यांच्या नव्या मोहिमेच्या निमित्ताने पहिल्यांदाच बाइकिंगला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. दुचाकी प्रत्यक्ष चालवताना वेग, हवेचा दबाव, चालकाच्या प्रतिक्रिया, त्वरण अशा विविध गोष्टींच्या नोंदी घेतल्या जातील. त्यातून दुर्गम भागात दुचाकी कशा प्रतिसाद देऊ शकतात, याचा अंदाज बांधायला मदत होणार आहे. त्याचा उपयोग पुढील मोहिमांत होऊ शकेल. असा प्रयोग याआधी केवळ चारचाकी शर्यतींत केला जात असे.

Web Title: exploring the world after twenty-three years, they are ready!