इंदापूर तालुक्‍यातील निर्यात द्राक्षे झाली कवडीमोल

राजकुमार थोरात  
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

परदेशात निर्यात (एक्‍स्पोर्ट) होणारी द्राक्ष नासण्यास सुरवात झाली आहे. 140 रुपये किलो दराची द्राक्षे 12 ते 15 रुपये कवडीमोल दराने विकावी लागल आहेत. 

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्‍यासह राज्याला परतीच्या व अवकाळी पावसाने झोडपले आहे. पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान केले आहे. परदेशात निर्यात (एक्‍स्पोर्ट) होणारी द्राक्ष नासण्यास सुरवात झाली आहे. 140 रुपये किलो दराची द्राक्षे 12 ते 15 रुपये कवडीमोल दराने विकावी लागल आहेत. 

द्राक्षांना चांगला दर मिळावा, म्हणून शेतकरी द्राक्ष बागेची आगाप छाटणी करीत असतात. आगाप छाटणी केलेली द्राक्षे पदरात पाडण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात औषधांचा खर्च करावा लागतो. 14 जुलैच्या आसपास छाटणी केलेल्या द्राक्ष बागेतील द्राक्षे परिपक्व झाली आहे. मात्र, परतीच्या व अवकाळी पावसाचे पाणी द्राक्षाच्या घडामध्ये साचल्याने द्राक्ष नासली आहेत. बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. डावणी रोगाच्या प्रादुर्भाव झाल्यामुळे द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फुलोऱ्यामधील घड जळून गेले आहेत. द्राक्ष बागेमधील परिपक्व द्राक्षे खराब झाल्याने बागेमध्ये दुर्गंधी येऊ लागली आहे. यापूर्वी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानापेक्षा कित्येक पटीने यावर्षी शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. 
 
गेल्या वर्षी इंदापूर तालुक्‍यातून 300 कंटेनर म्हणजे सुमारे साडेचार हजार टनाची द्राक्षाची निर्यात चायना, दुबई, युरोप, मलेशिया या देशामध्ये झाली होती. मात्र, या वेळी पावसाने द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे एक तरी कंटेनर निर्यात होईल की नाही ? याची शाश्‍वती नाही. 
- भारत शिंदे, मानद सचिव, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ 
 
पीक कर्ज माफ करा 

परतीच्या व अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना भुईसपाट केले आहे. शेतकऱ्यांच्या पदरात द्राक्षाचे पीक पदरात नसल्याने चालू वर्षीचे पीक कर्ज माफ करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Export grapes are rubbish