नारायणगावातून टोमॅटो दुबईला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

नारायणगाव - येथील उपबाजारात मंगळवारी (ता. २९) सुमारे तीस हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली. प्रतवारीनुसार क्रेटला (वीस किलो) शंभर रुपये ते तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. येथील उपबाजारातील चार व्यापाऱ्यांनी चांगल्या प्रतीच्या टोमॅटोची दुबईला निर्यात सुरू केल्याने बाजारभावात वाढ झाल्याची माहिती सभापती संजय काळे यांनी दिली.

नारायणगाव - येथील उपबाजारात मंगळवारी (ता. २९) सुमारे तीस हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली. प्रतवारीनुसार क्रेटला (वीस किलो) शंभर रुपये ते तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. येथील उपबाजारातील चार व्यापाऱ्यांनी चांगल्या प्रतीच्या टोमॅटोची दुबईला निर्यात सुरू केल्याने बाजारभावात वाढ झाल्याची माहिती सभापती संजय काळे यांनी दिली.

जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यात उन्हाळी व पावसाळी अशा दोन हंगामात टोमॅटोची लागवड केली जाते. उन्हाळी टोमॅटोचा तोडणी हंगाम मार्च ते मेदरम्यान तर पावसाळी टोमॅटोचा तोडणी हंगाम जून ते ऑगस्ट दरम्यान सुरू राहता. या वर्षी गेल्या पाच महिन्यापासून टोमॅटो क्रेटला पन्नास ते साठ रुपयांच्या दरम्यान भाव होता. या बाजारभावात तोडणी मजुरी, वाहतूक, पॅकिंग खर्च वसूल होत नसल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील टोमॅटोच्या बागा काढून टाकल्या.  

यामुळे बहुतेक शेतकऱ्यांचा उन्हाळी टोमॅटोचा तोडणी हंगाम वाया गेला. यामुळे जुन्नर, आंबेगावात शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. गेल्या दोन दिवसांपासून येथील उपबाजारात टोमॅटोच्या बाजारभावात वाढ होण्यास सुरवात झाली. आज येथील उपबाजारात सुमारे तीस हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली. चांगल्या प्रतीच्या निर्यातक्षम गजरा टोमॅटो क्रेटला तीनशे रुपये भाव मिळाला. दुय्यम दर्जाच्या टोमॅटो क्रेटला शंभर रुपये ते तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. टोमॅटो उत्पादक मागील पाच महिन्यांपासून भाव वाढण्याच्या प्रतीक्षेत होते. टोमॅटोच्या बाजारभावात वाढ झाल्याने उत्पादकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

गजरा टोमॅटोला चांगला भाव
उपबाजारातील चार व्यापाऱ्यांनी दुबईत टोमॅटोची निर्यात सुरू केली आहे. उपबाजारातून रोज चाळीस टन टोमॅटोची निर्यात होत आहे. यामुळे उच्च दर्जाच्या टिकाऊ गजरा टोमॅटोला चांगला भाव मिळत आहे. निर्यातीसाठी आठ किलोग्रॅम वजनाच्या बॉक्‍समध्ये टोमॅटोचे पॅकिंग केले जाते, अशी माहिती निर्यातदार योगेश बुचके यांनी दिली.

संपाची चिंता 
उपबाजारातून मुंबई, गुजरात, ओरिसा, दिल्ली या देशांतर्गत बाजारपेठेत सध्या तीस ट्रकमधून टोमॅटो विक्रीसाठी पाठवले जात आहेत. गुजरात राज्यातून टोमॅटोला वाढीव मागणी आहे. टोमॅटोचे भाव वाढले आहेत. मात्र एक जूनपासून शेतकरी संघटनांनी संप पुकारला आहे. संपामुळे शेतमालाची वाहतूक ठप्प झाल्यास टोमॅटो उत्पादकांचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Export of tomatoes from Narayangawa to Dubai