ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरियाला हापूस-केशरची गोडी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

पुणे - हापूस आणि केशर आंब्याच्या निर्यातीला पुढील आठवड्यापासून सुरवात होईल. या वर्षी पणन मंडळाच्या सुविधा केंद्रातून 1 हजार मेट्रिक टन आणि खासगी निर्यातदारांकडून सुमारे 36 हजार मेट्रिक टन इतका आंबा निर्यात होण्याचा अंदाज आहे. 

पुणे - हापूस आणि केशर आंब्याच्या निर्यातीला पुढील आठवड्यापासून सुरवात होईल. या वर्षी पणन मंडळाच्या सुविधा केंद्रातून 1 हजार मेट्रिक टन आणि खासगी निर्यातदारांकडून सुमारे 36 हजार मेट्रिक टन इतका आंबा निर्यात होण्याचा अंदाज आहे. 

महाराष्ट्रात सुमारे 4.85 लाख हेक्‍टर इतके आंबा लागवडीचे क्षेत्र आहे. राज्यात 12.12 लाख मेट्रिक टन इतका आंबा उत्पादित होतो. आंब्याच्या उत्पादनात देशांतील राज्यांच्या क्रमवारीत महाराष्ट्र 10 वा असला तरी निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा 60 ते 70 टक्के इतका आहे. गेल्या वर्षीपासून ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, इराण या देशांत निर्यात सुरू झाली असून, यंदाच्या हंगामात तेथील निर्यात वाढेल, असा अंदाज पणन मंडळाने व्यक्त केला आहे. 

गेल्या सहा वर्षांतील आकडेवारी 
वर्ष आंबा निर्यात (मेट्रिक टन) विक्रीचे मूल्य (कोटी रुपये) 
2012-13 55 हजार 585 मे. टन 264 कोटी रुपये 
2013-14 41 हजार 280 मे. टन 285 कोटी रुपये 
2014-15 42 हजार 998 मे. टन 302 कोटी रुपये 
2015-16 36 हजार 779 मे. टन 320 कोटी रुपये 
2016-17 52 हजार 761 मे. टन 443 कोटी रुपये 
2017-18 46 हजार 562 मे. टन 346 कोटी रुपये 

खासगी निर्यातदारांकडून या वर्षी अमेरिकेत 1 हजार मेट्रिक टन, युरोपियन देशांत साडेतीन हजार मेट्रिक टन, संयुक्त अरब अमिराती येथे 20 हजार मेट्रिक टन आणि इतर देशांत 12 हजार मेट्रिक टन इतका आंबा निर्यात होण्याचा अंदाज आहे. 

देशातील विविध पॅकहाऊस पणन मंडळाला ऑनलाइन जोडले गेले आहेत. "मॅंगोनेट'मध्ये नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. यामुळे आयातदार थेट शेतकऱ्यांकडून आंबा खरेदी करू शकतात. 

आंबा निर्यातवृद्धीसाठी पणन मंडळाने विकिरण सुविधा, व्हेपर हीट ट्रीटमेंट (उष्णजल प्रक्रिया) सुविधा वाशी येथे सुरू केली आहे. या केंद्रातील सुविधा अमेरिकेतील यु.एस.डी.ए. या संस्थेमार्फत प्रमाणित करून घेतल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत या केंद्रातून प्रक्रिया केलेला 471 मेट्रिक टन इतका आंबा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात निर्यात झाला आहे. इराण, दक्षिण कोरिया या देशांत गेल्या वर्षीपासून आंबा निर्यात सुरू झाली आहे. या वर्षी तेथील निर्यात वाढू शकते. 
सुनील पवार, कार्यकारी संचालक, पणन मंडळ 

Web Title: exports of mustard and saffron mangoes start from next week