#Expressway ‘द्रुतगती’वरील लेन कटिंगवर वॉच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

अशी होणार अंमलबजावणी
लेनच्या नियमांची अंमलबजावणीसाठी मार्गावर दहा ठिकाणी पोलिस कर्मचारी नियुक्त करणार आहेत. लेन कटिंग करणाऱ्या वाहनांचे ते शूटिंग करणार आहेत. त्या वाहनाचे छायाचित्रही काढले जाणार आहे. त्या वाहनाच्या क्रमांकावर वाहतूक नियमभंगाचे शुल्क (ई-चलनद्वारे) जमा होणार आहे. त्यामुळे वाहन न थांबविताही पोलिस कारवाई होणार आहे. १० ऑगस्टपर्यंत दोनशे रुपये दंड, तर त्यानंतर १ हजार रुपये दंड करणार आहे.

पुणे - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचा पॅटर्न बदलण्यास महामार्ग पोलिसांनी सुरवात केली असून, पहिल्या टप्प्यात लेन कटिंगवर भर देण्यात आला आहे. नव्या नियमानुसार आता लेन कटिंग केली, तर एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. जड वाहने डावीकडील किंवा दुसऱ्या लेनमधूनच वाहतूक करतील, यावर भर देण्यात आला आहे. त्यात एसटी आणि खासगी प्रवासी बसचाही समावेश करण्यात आला आहे.

द्रुतगती मार्गावर ९४ किलोमीटरमध्ये एसटी बस, खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस तसेच ट्रक अनेकदा उजवीकडील लेनमधून वाहतूक करतात. त्यामुळे मोटारी मध्य भागातील किंवा डावीकडील लेनमधून ओव्हरटेक करीत वाहतूक करतात. यामुळे अनेकदा अपघात घडले आहेत. त्यातच आता द्रुतगतीवरील वेगमर्यादा ताशी १२० किलोमीटर झाली आहे. त्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. द्रुतगती मार्गावर डावीकडील लेन जड वाहनांसाठी, मध्य भागातील लेनमध्ये मोटारी आणि उजवीकडील लेन ओव्हरटेक करण्यासाठी आहे. परंतु, जड वाहने उजवीकडील लेनचा सर्रास वापर करीत असल्याचे दिसत असल्यामुळे महामार्ग पोलिस विभागाने याबाबत पुन्हा एकदा अधिसूचना नुकतीच काढली आहे.

नव्याने आलेल्या अधिसूचनेनुसार लेन कटिंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू झाली आहे. एसटी महामंडळाच्या आगारांना पत्र पाठवून बसचालकांनी लेनच्या नियमांचे पालन करावे, याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच, खासगी बसचालक, जड वाहनांच्या संघटना यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.
- मिलिंद मोहिते, अधीक्षक, महामार्ग पोलिस 

लेन कटिंगबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी वाढीव दंड पुरेसा नाही; तर वाहनचालकांना दोन तास थांबवून ठेवणे, त्यांचा वाहन परवाना निलंबित करणे आदी उपायांबद्दलही विचार केला पाहिजे. त्याशिवाय सुरक्षित वाहतुकीचे उद्दिष्ट साध्य होणार नाही. 
- तन्मय पेंडसे, अभ्यासक, द्रुतगती मार्ग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Express Way Pune Mumbai Watch on Lane Cutting