मराठीच्या अभिजात दर्जासाठी अभिव्यक्त व्हा

मराठीच्या अभिजात दर्जासाठी अभिव्यक्त व्हा

पुणे -  ‘अमृतातेही पैजा जिंकी’ अशा माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यात राजकीय इच्छाशक्ती प्रचंड कमी पडत आहे. पत्रे पाठविली, पाठपुरावा केला. पण, राज्याच्या राजकीय नेतृत्वाने मात्र काडीचीही दखल घेतली नाही. पण, प्रत्येक मराठी मनाने आपल्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी अभिव्यक्त झालेच पाहिजे, असा हुंकार शिवराज्याभिषेक दिनी गुरुवारी महाराष्ट्रातून निघाला.

केंद्र सरकारने तमीळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. या घटनेला गुरुवारी १५ वर्षे पूर्ण झाली. मराठीला हा दर्जा देण्याचा प्रस्ताव अजूनही सरकारदरबारी प्रतीक्षेत आहे. त्यानिमित्ताने ‘सकाळ’कडे मराठी मनांनी आपली मते नोंदविली.

अभिजात मराठी भाषा समितीचे (पठारे समिती) समन्वयक प्रा. हरी नरके म्हणाले, ‘‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी ‘सकाळ’ने सातत्याने पाठपुरावा केला आहे. ज्या सहा भारतीय भाषांना हा दर्जा मिळालेला आहे; त्यांच्याप्रमाणेच मराठीने त्याबाबतचे सर्व निकष पूर्ण करून आता साडेचार वर्षे उलटली आहेत. आता विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. त्याआधी राज्य सरकारने केंद्राकडे या दर्जासाठी आग्रही पाठपुरावा करायला हवा.  तमीळ व इतर दक्षिणी भाषांकडून आपण भाषाप्रेम शिकायला हवे.’’

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी म्हणाले, ‘‘अभिजात भाषेच्या दर्जाबाबत दीड वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनीही आश्‍वासन दिले होते. परंतु, आता त्यांना याचा सोईस्कर विसर पडला आहे. मराठी माणसांचा आणि राज्यकर्त्यांचा मराठीबाबतचा अभिमान कमी पडत आहे.’’

साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संतसाहित्य यांचे मराठी साहित्य सातासमुद्रापार पोचले. परंतु, पंतप्रधानांपर्यंत ते पोचले नाही. गुजराती संस्कृती व भाषेला निर्णायक गोष्टी दिल्या. परंतु, महाराष्ट्रावर व मराठी भाषेवर त्यांनी अन्याय केला आहे.’’

मराठी ही उत्तम वाङ्‌मय आणि वारसा असलेली भाषाच आहे. मराठीच्या अस्तित्वाचे अनेक प्राचीन पुरावे देऊनही अभिजात दर्जा न मिळाल्याची खंततर आहेच. शिवाय, आपली मराठी किती समर्थ आणि सुंदर आहे, याविषयी किती जनजागृती आहे? याबद्दल आपण लक्ष दिले पाहिजे. 
- अरुणा ढेरे, अध्यक्षा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com