"एक्‍स्प्रेस-वे'ची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी निविदा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

पुणे -  पुणे-मुंबई महामार्गावरील (एक्‍स्प्रेस वे) लोणावळा-खंडाळा घाटातील क्षेत्रामध्ये होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी द्रुतगती मार्गाची क्षमता वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गाची क्षमता वाढविण्याचे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले काम मार्गी लागण्याच्या दृष्टीने पडलेले आणखी एक पाऊल आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने गेल्या वर्षी या महामार्गाच्या आठ पदरीकरणाला मान्यता दिली होती. तेव्हापासून महामार्गाच्या आठ पदरीकरणाची चर्चा सुरू होती. त्यानंतर या संदर्भातील अध्यादेश काढण्यास राज्य सरकारला काही महिन्यांचा कालावधी लागला. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल, अशी आशा निर्माण झाली होती. तर पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील अतिरिक्त कामांसाठी 31 जुलै 2030 पर्यंतची मुदत आहे. एक्‍स्प्रेस वेवर खंडाळा घाट, बोरघाट येथे वारंवार वाहतूक कोंडी होते. पुण्याहून जाताना तीव्र उतार, तर मुंबईकडून येताना चढ असल्याने अनेकदा अपघात होतात.

महामंडळाकडून निविदा काढण्यात आल्यामुळे लोणावळा येथील कुसगाव ते खोपोली एक्‍झिट हा बारा किलोमीटरचा आठ पदरी रस्ता आणि खालापूर फूडमॉल ते खोपोली इंटरचेंज दरम्यानचा आठ पदरी उन्नतमार्ग (एलिव्हेटेड) बांधण्याच्या कामाला लवकरच सुरवात होणार आहे. या मार्गात दोन बोगदे आणि दोन "व्हाया डक्‍ट'चा समावेश आहे. या कामासाठी तीन हजार 215 कोटी रुपये खर्च असून, त्यास यापूर्वीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) या कामासाठीचा निधी उभारला जाणार आहे. या प्रकल्पाचे काम ईपीसी (इंजिनिअरिंग प्रोक्‍युरमेंट कन्ट्रक्‍शन) तत्त्वावर करणे अपेक्षित आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक निविदा मागविण्यात आल्या आहेत. तसेच, या प्रकल्पाचा सर्वंकष आराखडा (डीपीआर) तयार करणे, इकॉनॉमिक बेनिफिट ऍनॅलिसिस करून त्याचा अहवाल पायाभूत सुविधा समितीच्या मान्यतेसाठी पुन्हा सादर केला जाणार आहे.

ही कामे होणार
- खोपोली एक्‍झिट ते कुसगावदरम्यान दोन बोगदे
- आठपदरी रस्ता
- खालापूर फूडमॉल ते खोपोली इंटरचेंजदरम्यान आठ पदरी उन्नत (एलिव्हेटेड) मार्ग
- एकूण खर्च 3 हजार 215 कोटी रुपये

Web Title: expressway traffic congestion break tender