"एक्‍स्प्रेस वे'वर इनव्हिजिबल पोलिसिंगचा फंडा ! 

गुरुवार, 5 एप्रिल 2018

पुणे - वर्दळीच्या "एक्‍स्प्रेस वे'वरून प्रवास करताना लेन कटिंग केली किंवा भरधाव कार चालवत असाल तर तुमच्या वाहनाचा फोटो काढून काही मिनिटांतच तुम्हाला दंड ठोठावला जाऊ शकतो. कारण महामार्ग पोलिसांनी सुरू केले आहे इनव्हिजिबल पोलिसिंग. मोटार, ट्रक, बस आदी प्रकारच्या सुमारे 350 ते 400 वाहनांवर दररोज या प्रकारे कारवाई होऊ लागली आहे. 

पुणे - वर्दळीच्या "एक्‍स्प्रेस वे'वरून प्रवास करताना लेन कटिंग केली किंवा भरधाव कार चालवत असाल तर तुमच्या वाहनाचा फोटो काढून काही मिनिटांतच तुम्हाला दंड ठोठावला जाऊ शकतो. कारण महामार्ग पोलिसांनी सुरू केले आहे इनव्हिजिबल पोलिसिंग. मोटार, ट्रक, बस आदी प्रकारच्या सुमारे 350 ते 400 वाहनांवर दररोज या प्रकारे कारवाई होऊ लागली आहे. 

सुमारे 94 किलोमीटरच्या "एक्‍स्प्रेस वे'वर भरधाव वाहनांचे होणारे अपघात ही पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली आहे. ती दूर करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात तरी वाहनचालकांची बेशिस्त कमी झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. महामार्ग पोलिस विभागाचे अतिरिक्त महासंचालक पद्मनाभन यांच्या संकल्पनेतून ही कारवाई सुरू झाली आहे. "सकाळ'ने या बाबत मंगळवारी (ता. 3) प्रत्यक्ष पाहणी केली असता, इनव्हिजिबल पोलिसिंगचे स्वरूप उघड झाले. 

असे आहे इनव्हिजिबल पोलिसिंग 
द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाका पास केल्यावर एक दुधाचा टॅंकर सातत्याने मधल्या लेनमधून जात होता. खरे तर त्या टॅंकरचालकाने डावीकडील लेनमधून प्रवास करणे अपेक्षित होते. महामार्ग पोलिसांच्या पथकातील एक कर्मचारी उर्से टोलनाक्‍यावरून खासगी मोटार अथवा प्रवासी बसमध्ये प्रवास करतो. दुधाचा टॅंकर सातत्याने मधल्या लेनमधून जात असल्याचा फोटो तो मोबाईलमध्ये काढतो. फोटो काढल्याचे ठिकाण आणि त्या वाहनाचा क्रमांक नोंदवून त्याचा तपशील तो पोलिसांच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर पाठवतो. तो टॅंकर खालापूर टोलनाक्‍यावर पोचल्यावर तेथील पोलिसांचे पथक त्याला थांबवते. लेन कटिंगचा पुरावा त्याला दाखवून 200 रुपये दंड करते. या पद्धतीने महामार्ग पोलिसांकडून 24 तास कारवाई सुरू असते. एसटी महामंडळाच्या शिवनेरी, शिवशाही आदी बसचालकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास त्याबाबत एका रजिस्टरमध्ये नोंद केली जाते. त्याची माहिती दरमहा एसटीच्या संबंधित विभाग नियंत्रकांकडे पुढील कारवाईसाठी पाठविली जाते. 

- द्रुतगती मार्गावरून दररोज ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या - अंदाजे सुमारे 40 हजार 
- उर्से, लोणावळा, खालापूर, कळंबोली येथे होते पोलिसांकडून कारवाई 
- द्रुतगती मार्गावरील लेनचे नियम - 
सर्वांत उजवीकडील लेन (क्र. 1) मोटार, बस यांना फक्त ओव्हरटेक करण्यासाठी 
मध्य भागातील लेन (क्र. 2) ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या हलक्‍या, मध्यम तसेच बस आदी वाहनांसाठी 
डावीकडील लेन (क्र. 3) जड वाहनांच्या वाहतुकीसाठी 

या नियमभंगाबद्दल होते कारवाई 
- लेन कटिंग, इंडिकेटर न दाखविता लेन बदलणे, वाहन संथ चालविणे, नो पार्किंग (मोटार वाहन कलम 177 आणि अंतर्गत उपकलमे) - 200 रुपये दंड 
- निष्काळजीपणाने भरधाव वाहन चालविणे (मो. वा. कलम 184) - 1000 रुपये दंड 
- लायसन्स न बाळगणे (मो. वा. कलम 196) - 500 रुपये दंड 
- वाहनाचा विमा नसणे (मो. वा. कलम 196) - चालकाला 200 रुपये तर मालकाला 2000 रुपये दंड 

वाहनांची संख्या दररोज वाढतेच आहे. या मार्गावर सुमारे 70 टक्के वाहने नियमित वाहतूक करतात. इनव्हिजिबल पोलिसिंगमुळे किमान लेनची शिस्त त्यांना माहिती झाली असून, भरधाव वाहनांच्या वेगावर नियंत्रण आले आहे. परिणामी, वाहतुकीच्या कोंडीवर नियंत्रण आले असून अपघातांची संख्याही कमी झाली आहे. 
- विजय पाटील, अधीक्षक 

द्रुतगती मार्गावर या पूर्वी वाहनांचा वेग ही चिंतेची बाब होती. त्यांचा पाठलाग करून ती वाहने थांबविणे अवघड होते. परंतु इनव्हिजिबल पोलिसिंगमुळे ऊर्से, खालापूर आदी टोलनाक्‍यांवर कारवाई करणे शक्‍य झाले आहे. कारवाईचे हे स्वरूप आता वाहनचालकांना माहिती होऊ लागले आहे. 
- दत्तात्रेय गाढवे, पोलिस निरीक्षक 

लेन कटिंगची चूक माझ्याकडून झाली, असे पोलिसांनी मला खालापूर टोलनाक्‍यावर सांगितले. सुरवातीला मला माझी चूक कबूल नव्हती. परंतु मोबाईलवरील फोटो बघितला आणि चूक मला कबूल झाली. मला दंड झाला असला, तरी अशाप्रकारची कारवाई आवश्‍यक आहे, असे वाटते. पुराव्यासह कारवाई होत असल्यामुळे या पद्धतीमध्ये पारदर्शकता आहे, असे वाटते. 
- दत्तात्रेय पोळ, दूध टॅंकरचालक 
(पोळ यांना 3 एप्रिल रोजी खालापूर टोलनाक्‍यावर दुपारी एकच्या सुमारास दंड झाला)

Web Title: expressway way invisible policing