मेटल क्रॅश बॅरीअरमुळे "एक्‍स्प्रेस वे' होणार पॅक 

मंगळवार, 10 एप्रिल 2018

पुणे - द्रुतगती मार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी तब्बल 175 किलोमीटरचे मेटल क्रॅश बॅरीअर उभारण्यास सुरवात झाली आहे. येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण होणार असून, त्यानंतर "एक्‍स्प्रेस वे' पॅक होणार आहे. त्यामुळे गाय- बैल या रस्त्यावर दिसणे, हे दृश्‍य इतिहासजमा होऊ शकते. 

पुणे - द्रुतगती मार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी तब्बल 175 किलोमीटरचे मेटल क्रॅश बॅरीअर उभारण्यास सुरवात झाली आहे. येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण होणार असून, त्यानंतर "एक्‍स्प्रेस वे' पॅक होणार आहे. त्यामुळे गाय- बैल या रस्त्यावर दिसणे, हे दृश्‍य इतिहासजमा होऊ शकते. 

द्रुतगती मार्गाची उभारणी करताना सुरवातीला रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे तीन फुटांवर लोखंडी जाळी बसविली होती. परंतु, जाळीचे हे कुंपण टिकले नाही. त्यामुळे प्राणी, दुचाकी रस्त्यावर येऊ लागले. परिणामी अपघातही होऊ लागले. ते रोखण्यासाठी सुमारे 30 किलोमीटर अंतरावर वायर रोप लावण्यास राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सुरवात केली. मात्र या रोपच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च जास्त असल्याचे दिसून आले. त्यातच एखादी गाडी रोपवर आदळली तरी, अपघाताची तीव्रता कमी होत नसल्याचेही आढळले. त्यामुळेच अपघाती वाहने रस्ता ओलांडून विरुद्ध बाजूला जात असल्याचे दिसून आले. 

द्रुतगती रस्त्यावर मेटल क्रॅश बॅरीअर काही वर्षांपूर्वी धोकादायक ठिकाणी बसविले होते. त्यांची उपयुक्तता दिसून आल्यावर "एमएसआरडीसी'ने दुभाजकासह 175 किलोमीटरचे मेटल क्रॅश बॅरीअर उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन गेल्या महिन्यात कामाला सुरवात झाली आहे. कामशेत परिसरात सध्या सुमारे 12 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. 

रस्त्याच्या दुतर्फा 109 किलोमीटरचे मेटल क्रॅश बॅरीअर बसविण्यात येत आहेत. त्यासाठीचे खांब तीन फूट जमिनीत व सुमारे 2. 3 फूट जमिनीवर आहेत. दोन खांबांमध्ये सुमारे दोन मीटरचे अंतर आहे. त्यासाठी विशिष्ट पद्धतीचे स्टिल लावण्यात येत आहे. त्यामुळे एखादे वाहन त्यावर आदळले तरी, घसरत पुढे जाऊन अपघाताची तीव्रता कमी होऊ शकते. हे बॅरीअर 66 किलोमीटरवर दुभाजक म्हणूनही लावण्यात येणार आहेत. त्यामुळे अपघात झाल्यावर वाहन पलीकडील रस्त्यावर जाणार नाही. येत्या नोव्हेंबरपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. 

वायर रोप आणि या पूर्वीचे बॅरीअर कायम राहणार असून, उर्वरित ठिकाणी बॅरीअर बसविण्याचे काम आता सुरू करण्यात आल्याचे "एमएसआरडीसी'च्या सूत्रांनी स्पष्ट केले. 

मेटल क्रॅश बॅरीअर बसविण्याचे काम व्हॉलमॉन्ट कंपनी करीत आहे. या कंपनीचे हायवे सेफ्टी डिव्हिजनचे अध्यक्ष शैलेश नागले म्हणाले, ""मेटल क्रॅश बॅरीअर हे मॅश-3 व मॅश 4 लेव्हलचे आहेत. अपघात झाल्यावर तो सहन करण्याची क्षमता जास्त असलेले मटेरीअलचा वापर बॅरीअर उभारणीसाठी वापरले जात आहे. एमएसआरडीच्या सूचनांनुसार नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण होईल.'' 

संजय विद्वंस (नियमित प्रवासी) - पुणे - मुंबई रस्ता या पूर्वीच बंदिस्त होणे गरजेचे होते. एक्‍सप्रेस वे वर प्राणी, दुचाकी दिसणे अत्यंत वाईट होते. हा रस्ता बंदिस्तच राहिला पाहिजे. त्यासाठी मेटल क्रॅश बॅरीअरचे काम वेगाने पूर्ण व्हायला हवे.'' 

द्रुतगती मार्गाची लांबी - 94 किलोमीटर 
रोज ये-जा होणाऱ्या वाहनांची संख्या - सुमारे 40 हजार 

Web Title: Expressway will pack due to metal crush barrels