
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ३ जूनपर्यंत मुदतवाढ
पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे आता पालकांना प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश ३ जूनपर्यंत निश्चित करता येणार आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार (आरटीई) दरवर्षीप्रमाणे खासगी शाळांमधील २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार २०२२-२३ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील बालकांचे प्रवेश पालकांनी शाळेत जाऊन निश्चित केले आहे. आता प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले. पुणे जिल्हा वगळता संपूर्ण राज्यातील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने पुणे जिल्ह्यातील आता सुरू केली असून जिल्ह्यातील प्रतीक्षा यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी देखील ३ जूनपर्यंत मुदत दिली आहे.
Web Title: Extension Till June 3 For Students Rte Admission 25percent Reserved Seats Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..