...तर कॉंग्रेसचा बाहेरून पाठिंबा 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 December 2019

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर कॉंग्रेसला ग्रामीण भागाशी संबंधित महत्त्वाची खाती मिळणार नसतील, तर सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा मार्ग पत्करण्याची सूचना कॉंग्रेसच्या काही बड्या नेत्यांनी राज्यातील नेत्यांना केली आहे.

मुंबई - येत्या काही दिवसांत होऊ घातलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर कॉंग्रेसला ग्रामीण भागाशी संबंधित महत्त्वाची खाती मिळणार नसतील, तर सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा मार्ग पत्करण्याची सूचना कॉंग्रेसच्या काही बड्या नेत्यांनी राज्यातील नेत्यांना केली आहे. शिवसेनेने अत्यंत आग्रहाने गृह खाते स्वत:कडे ठेवले होते. मात्र, तेच राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सोपविण्याचा निर्णय जवळपास अंतिम झाला आहे. खात्यांची फेरमांडणी होत असेल, तर कॉंग्रेसलाही महत्त्वाची खाती मिळाली पाहिजेत, अशी मागणी आमदारांमध्ये जोर धरते आहे. सहकार, ग्रामविकास ही खाती महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाची मानली जातात. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या दोघांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास राष्ट्रवादीच्या वर्चस्वावर लक्ष ठेवणे सोपे जाईल, असे काही जणांना वाटते. त्यातच "सामना'च्या अग्रलेखात दोन्ही चव्हाणांवर टीका झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस जवळ येत असल्याने कॉंग्रेसने अधिक आक्रमक व्हायला हवे, असे मत एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्‍त केले. अल्पसंख्याक मतदार कॉंग्रेसच्या जवळ असावेत, यासाठी मुंबादेवीचे सक्रिय आमदार अमीन पटेल यांचा सरकारमध्ये समावेश जवळपास निश्‍चित मानला जातो. अनेक तरुण तुर्कांनाही सरकारमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे. यशोमती ठाकूर, अमित देशमुख, विश्‍वजित कदम, रणजित कांबळे या तरुणांनाही मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात यावे, यासाठी धडपड सुरू आहे. मराठवाड्यातून कुणाला प्रतिनिधित्व द्यावे, याचाही विचार करावा लागणार असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने नमूद केले. कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी मंत्रिमंडळ विस्तारात लक्ष द्यावे, यासाठी त्यांना नागपुरात पाठविण्यात आले आहे. उद्या (ता. 19) त्यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक होईल. 

सुकाणू समिती 
दरम्यान, तीन पक्षांनी एकत्र येऊन तयार केलेल्या सरकारचे कामकाज उत्तमरीत्या चालावे, यासाठी पक्ष आणि मंत्रिस्तरावर अशा दोन वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या सुकाणू समितीसाठी खरगे यांच्याबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव सुचविले होते. मात्र, त्याबद्दल कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: External support of Congress