बाकखरेदीतील उधळपट्टीला ‘ब्रेक’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जून 2019

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून अवाजवी दराने केली जाणारी बाकखरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यामुळे मागील आर्थिक वर्षात मध्यवर्ती भांडार विभागाकडून बाकखरेदी करण्यात आली.

पुणे - महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून अवाजवी दराने केली जाणारी बाकखरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यामुळे मागील आर्थिक वर्षात मध्यवर्ती भांडार विभागाकडून बाकखरेदी करण्यात आली. या खरेदीत बाकांची किंमत जवळपास निम्म्याने कमी होऊन प्रत्येकी ५ हजार ५९८ रुपयांवर आली आहे. त्यामुळे बाकखरेदीतील उधळपट्टी थांबून मोठ्या प्रमाणात निधीत बचत झाली आहे.

महापालिकेकडून नगरसेवकांच्या आग्रहाखातर दरवर्षी बाकांची खरेदी केली जाते. हे बाक उद्याने, पादचारी मार्ग, मंदिरे, सोसायट्यांमध्ये ठेवून नागरिकांची बसण्याची सोय केली जाते. विशेष म्हणजे, त्यावर नगरेसवक स्वतःचे नाव टाकून जाहिरात करतात. या माध्यमातून जनतेची सेवा केल्याचा आनंद नगरसेवकांना असतो. अनेक वर्षांपासून क्षेत्रीय कार्यालयांकडून स्थानिक पातळीवर बाकखरेदी केली जात होती. त्यामध्ये दर करार विचारात न घेता वाटेल त्या पद्धतीने बाकखरेदी होत होती. त्यामुळे शहरात लोखंडी, स्टीलसह वेगवेगळ्या प्रकारचे बाक पाहायला मिळत होते. त्यांची किंमत १० ते ११ हजार रुपये लावली जात होती. अशा प्रकारे दरवर्षी कोट्यवधींची खरेदी केली जात होती. प्रत्यक्षात किती खरेदी झाली आणि वाटप झाले, याचा हिशेबही लागत नव्हता. बाकखरेदी संशयास्पद असल्याच्या आरोपानंतर नगरसेवकांसाठी मध्यवर्ती भांडार विभागाकडून बाकखरेदीचा निर्णय घेतला. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये मध्यवर्ती भांडार विभागाने १०४ नगरसेवकांसाठी ७ हजार बाक खरेदी केले असून, ही खरेदी ३ कोटी ९१ लाख ८६ हजार रुपयांत झाली आहे.

क्षेत्रीय कार्यालयांकडून यापूर्वी बाकखरेदी केली जात होती. यंदा भांडार विभागाकडून ती केली गेली. यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारच्या बाकांची खरेदी केली जात होती. त्यांची किंमतही जास्त होती. यंदा सात हजार बाक घेतले असून, त्यांची किंमत कमी आहे.
- तुषार दौंडकर, प्रमुख, मध्यवर्ती भांडार विभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extra funding has been stopped in Bench Shopping