यंदा अधिकचा पोलिस बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून शहरात बांधलेल्या सुलभ शौचालयाचा ठेकेदार यात्रा काळात वारकऱ्यांची आर्थिक लूट करतो. दरवर्षी निदर्शनास आणूनही कारवाई केली जात नाही. यामुळे यंदाच्या वर्षीपासून किमान यात्रा काळात सुलभ शौचालये वारकऱ्यांना मोफत ठेवण्याचे आदेश द्यावेत. 
- वैजयंता उमरगेकर, नगराध्यक्षा

आळंदी - अयोध्या प्रकरणाच्या निकालाचा परिणाम यात्रेवर होऊन वारकऱ्यांना झळ पोचू नये, यासाठी कार्तिकी वारीत यंदाच्या वर्षी अधिकचा पोलिस बंदोबस्त मागविला आहे. वारीत सुरक्षात्मक उपाययोजना जाचक वाटल्या तरी सर्वांनी सहकार्य करावे. सर्व शासकीय यंत्रणांनी वारीत वारकऱ्यांना अधिकाधिक सोयीसुविधा पुरवाव्यात, असे आवाहन सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत आलसटवार आणि प्रभारी प्रांताधिकारी अजय पवार यांनी केले.

विविध शासकीय विभागांची प्राथमिक आढावा बैठक प्रभारी प्रांताधिकारी पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आळंदीत पार पडली. या वेळी तहसीलदार सुचित्रा आमले, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर, मुख्याधिकारी समीर भूमकर, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे, अजित कुलकर्णी, अभय टिळक, मारुती कोकाटे, नगरसेवक यांच्यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.
आलसटवार यांनी सांगितले की, मागील वर्षीपेक्षा यंदा अधिक बंदोबस्त असेल. शहरात १८ नोव्हेंबरपासून वाहन पास पाहून वाहने सोडण्यात येतील. चारचाकी वाहनांना यात्रा काळात बंदी असेल. मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आणि नदीकाठी विशेष पोलिसांचा बंदोबस्त आहे.  

पवार यांनी सांगितले की, शहरात संशयास्पद हालचाली टिपण्यासाठी आणि वारकऱ्यांना मंदिरातील परिस्थिती लक्षात यावी, यासाठी विविध ठिकाणी नगरपालिका आणि देवस्थानने सीसीटीव्ही यंत्रणा उभारावी. अन्न भेसळ प्रतिबंधक पथकाकडून तयार अन्नाची यात्रेअगोदर आणि यात्रा काळात तपासणी केली जाईल. संपर्कासाठी सर्व कंपन्यांना उच्च दर्जाची सेवा देणारे मोबाईल मनोरे उभारणीबाबत सांगितले आहे. स्वच्छता, आरोग्य आणि पाणी याबाबत नगरपालिका चोवीस तास सेवा देईल. तयारीबाबतची अंतिम आढावा बैठक १५ नोव्हेंबरला होईल. प्रत्येक शासकीय विभागाचा प्रतिनिधी यात्रा काळात मध्यवर्ती संपर्क कार्यालयात चोवीस तास कार्यरत राहणार असून, हे कार्यालय आळंदी पोलिस ठाण्यात असेल. 

महाद्वारात दर्शन करून आल्यानंतर वारकऱ्यांना बाहेरचा मार्ग बंद करून पर्यायी व्यवस्था करावी. कारण प्रत्येक भाविक मंदिर प्रदक्षिणा व दर्शन करून महाद्वारात येतो. त्यामुळे गर्दी अथवा चेंगराचेंगरी होणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी स्वीकृत सदस्य संतोष गावडे यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: extra Police Bandobast in Alandi