किल्लारीच्या भूकंपाने आयुष्यात उभे राहायला शिकविले!

किल्लारीच्या भूकंपाने आयुष्यात उभे राहायला शिकविले!

शिक्रापूर : ''घर आणि कुटुंब उद्‌ध्वस्त करणाऱ्या भूकंपानेच मला संघर्ष करत आयुष्यात उभे राहायला शिकविले. संघर्षाच्या काळातही आनंदी जगायला शिकविले,'' हे आत्मकथन आहे, किल्लारी परिसरात 1993 च्या भूकंपात घर, कुटुंब उद्‌ध्वस्त झाल्याने पुण्यात येऊन सध्या शिक्रापुरात उद्योजक म्हणून वावरणाऱ्या सुधीर मुळे यांचे. 

किल्लारी आणि परिसरात 30 सप्टेंबर 1993 रोजी पहाटे चारच्या सुमारास भूकंपाचे तीन मोठे धक्के बसले आणि किल्लारीसह त्या भागातील अनेक गावे बेचिराख झाली. त्यात शेकडो जणांचा मृत्यू आणि हजारो कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली. त्या घटनेला आज 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मुळे यांनी आठवणींना उजाळा दिला. 

ते म्हणाले, की किल्लारीच्या भूकंपाने आम्हाला काय दिले तर कोवळ्या वयात निसर्गाचा प्रकोप, अंधारलेल्या भविष्याची चाचपणी, जगण्याची उभारी आणि आयुष्यभरासाठी मिळालेले शांतिलाल मुथ्थांसारखे देवदूत. इयत्ता सातवीत असताना भूकंपाचे संकट गाव आणि कुटुंबावर कोसळले. माझे मामा राजेंद्र शिंदे यांनी मला भारतीय जैन संघटनेच्या पुण्यातील संत तुकाराम नगरमध्ये 2000 भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात पाठविण्याचे ठरविले. त्यानुसार या प्रकल्पात मी दाखल झालो. पहाटे पाच ते रात्री दहा अशा व्यस्त वेळापत्रकात बांधून ठेवलेल्या या संस्थेने जगणे शिकविले. 

शारीरिकच नव्हे; तर मानसिकदृष्ट्या खंबीर बनविण्याचे काम केलेल्या या संस्थेने पुढे आत्मनिर्भर होण्याचे बाळकडू दिले. त्यामुळेच गेल्या वीस वर्षांत 386 प्रकारच्या कृष्णधवल संगणकापासून आज शक्तिशाली महासंगणकापर्यंत पोचवून त्याची प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून जिल्ह्यात नावलौकिक मिळविता आला. संकटाच्या सोबतीने संधीही येत असतात, मुथ्था यांनी शिकविले आणि मी शिक्रापुरात एक संगणक प्रशिक्षण केंद्र 2001 मध्ये सुरू केले. पुढे महा ई-सेवा केंद्र आणि दोन वर्षांनंतर एएसएन-टेक्‍नॉसॉफ्ट कंपनीची स्थापना करून केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागासोबत संपूर्ण राज्यासाठी काम सुरू केले, असे मुळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com