फेसबुकवर मैत्रीतून डॉक्‍टर तरुणीची तब्बल सव्वा नऊ लाखांची फसवणूक 

facebook
facebook

पुणे : शहरातील नामांकीत हॉस्पिटलमधील डॉक्‍टर तरुणीशी फेसबुकवर मैत्री वाढवून वेगवेगळ्या प्रकारची कारणे सांगत एका तरुणासह तिघांनी तरुणीला तब्बल नऊ लाख रुपयांना गंडा घातला. हा प्रकार मागील एक वर्षापासुन सुरू होतो.
 

याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एरंडवणे येथे राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यावरुन हर्षा चेरकुरी उर्फ वामसी मनोहर जोगाडा याच्याविरुद्ध अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. एक महिला व बँक खातेदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आंध्रप्रदेशातील काकीनाडा येथील मुळ रहिवासी असून सध्या त्या एरंडवणे परिसरातील एका नामांकीत हॉस्पीटलमध्ये डॉक्‍टर आहेत. फिर्यादीच्या फेसबुकद्वारे हर्षा चेरकुरी याने त्यांच्याशी ओळख वाढविली. त्याने अन्य व्यक्तींमार्फत फिर्यादीस त्याच्या सामाजिक कार्य व कंपनीबद्दल सांगितले. त्यामुळे फिर्यादीचा त्यांच्यावरील विश्‍वास वाढला. त्यानंतर चेरकुरीने फिर्यादीशी मैत्री करून तो त्यांच्यावर प्रेम करत असल्याचे भासविण्याबरोबरच लग्न करण्याचे आमिषही दाखविले. त्यानंतर दोघांमध्ये व्हॉटसअप, मेसेंजरद्वारे चॅटींग सुरु झाली. फिर्यादीचे फेसबुक अकाऊंट त्याने वापरण्यास सुरूवात केली. दरम्यान, चेरकुरीने फिर्यादीचा विश्‍वास संपादन करुन त्यांना प्रारंभी भास्करन फाऊंडेशन या सामाजिक संस्थेस 30 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने त्याने सांगितलेल्या बँक खात्यात पैसे भरले. त्यानंतर सातत्याने वेगवेगळ्या प्रकारची कारणे सांगून त्याने फिर्यादीकडून तब्बल सव्वा नऊ लाख रुपये घेतले. त्यासाठी अनेकदा मित्र-मैत्रीणी व कुटुंबीयांकडून पैसे घेऊन चेरकुरीने सांगितलेल्या बँक खात्यांवर जमा केले.
 

दरम्यान, फिर्यादीने सहा जुन रोजी त्यांचे फेसबुक अकाऊंट तपासले. तेव्हा चेरकुरीने त्यांच्या काही मित्रांना ब्लॉक केल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये अशोक गल्लपल्ली याचे नाव होते. गल्लपल्लीचा चेहरा ओळखीचा वाटल्याने फिर्यादीने त्याचे फेसबुक प्रोफाईल पाहीले. तेव्हा हर्षा चेरकुरी व अशोकचे छायाचित्रामध्ये साम्य आढळले. तसेच अशोकच्या फेसबुकवरील "वामसी मनोहर जोगाडा हा तरुणींना खोटी माहिती देऊन त्यांची फसवणूक करत आहे' हा मेसेज पाहीला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com