अकरा गावांत पुढील वर्षापासून सुविधा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

येरवडा - पुणे महापालिकेत नव्याने समावेश झालेल्या अकरा गावांतील जिल्हा परिषदेची आरोग्य केंद्रे व शाळा महापालिकेत अद्याप वर्ग झालेल्या नाहीत. महापालिकेने ग्रामपंचायतींचे दप्तर, स्थानिक जंगम मालमत्ता ताब्यात घेतली आहे. येथील रहिवाशांनाकडून मालमत्ताकर आकारण्यासही सुरवात केली आहे. मात्र या गावांतील आरोग्यसुविधा व शैक्षणिक सुविधा पुढील आर्थिक वर्षापासून देण्यात येणार आहेत. 

महापालिकेत लोहगाव, केशवनगर, साडेसतरा नळी, उंड्री, उरुळी देवाची, फुरसुंगी, शिवणे, आंबेगाव खुर्द, धायरी, आंबेगाव बु. आणि उत्तमनगर या गावांचा समावेश झाला आहे. या गावांपैकी फुरसुंगीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र; तर काही गावांमध्ये उपआरोग्य केंद्र आहेत. पुणे जिल्हा परिषद येथील आरोग्य केंद्रांत प्रसूतिगृहांसह बाह्यरुग्ण विभाग आणि गरोदर माता आणि बालकांच्या लसीकरणाची सुविधा देत आहेत. या गावांतील लोकसंख्येचा विचार करता येथील मनुष्यबळ व साधनसामग्री पुरेशी नाही. मात्र या गावांना महापालिकेच्या आरोग्यसुविधा पुढील आर्थिक वर्षापासून मिळणार आहेत. 

समावेश झालेल्या अकरा गावांतील जिल्हा परिषदेच्या पहिले ते सातवीपर्यंतच्या अकरा प्राथमिक शाळांत सहा हजार विद्यार्थी व दीडशे शिक्षक आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी या शाळा महापालिकेत वर्ग व्हाव्यात, अशी येथील नागरिकांची मागणी होती. 

मात्र, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे शिक्षक महापालिकेत वर्ग करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडे अतिरिक्त असलेल्या शिक्षकांची पुढील वर्षापासून या गावातील शाळेत नियुक्ती होऊ शकते.

अकरा गावांतील सर्व शाळा पुढील वर्षी महापालिकेत वर्ग होतील. जिल्हा परिषदेचे शिक्षक महापालिकेत वर्ग होण्याची शक्‍यता नाही. पुढील शैक्षणिक वर्षापासून या गावांतील विद्यार्थ्यांना महापालिकेच्या सोईसुविधा दिल्या जातील. 
- शिवाजी दौंडकर, शिक्षणप्रमुख, शिक्षण मंडळ, महापालिका

जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची महापालिका आयुक्तांसोबत बैठक झाली आहे. पुढील आर्थिक वर्षापासून अकरा गावांतील आरोग्य उपकेंद्र महापालिकेच्या आरोग्य विभागात वर्ग होतील. त्यानंतर येथील नागरिकांना आरोग्यसुविधा नियमित मिळतील. 
- डॉ. अंजली साबणे, प्रभारी आरोग्यप्रमुख, महापालिका

Web Title: Facilities for eleven villages from next year