साखर आयातीचा कारखान्यांना फटका

संतोष शेंडकर
रविवार, 30 एप्रिल 2017

दरात १४० रुपये प्रतिक्विंटलची घट; उसाला चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षांना धक्का

सोमेश्‍वरनगर - केंद्र सरकारने केलेल्या साखरेच्या आयातीचा अखेर साखर कारखान्यांना फटका बसला आहे. आयातीच्या निर्णयानंतर साखरेच्या दरात तब्बल १४० रुपये प्रतिक्विंटलची घट झाली असून, व्यापाऱ्यांकडून साखरेची उचलही कमी होत आहे. एप्रिलच्या सुरवातीला एस (लहान) साखरेचे ३६६५ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत असणारे दर आता थेट ३५२५ रुपये प्रतिक्विंटलवर येऊन पोचले आहेत. त्यामुळे कारखाने धास्तावले असून, उसाला चांगला भाव मिळण्याच्या शेतकऱ्यांच्या अपेक्षांना धक्का बसू लागला आहे.

साखरेचा देशात पुरेसा साठा असतानाही साखरेचे दर ग्राहकांच्या आवाक्‍यात आणण्याच्या नावाखाली केंद्र सरकारने रिफायनरीजना फायदेशीर होईल, असा निर्णय घेतला. त्यानुसार कच्च्या साखरेची पाच लाख टनांची आयात सुरू झाली आहे. ३ एप्रिलला केंद्र सरकारने तो निर्णय घेतला, तेव्हाच दर घसरणार अशी चर्चा सुरू झाली होती. अशातच उत्तर प्रदेशात या वेळी साखर जादा तयार झाली असून, जवळच्या राज्यांना ते स्वस्त दराने विकत आहेत. या कारणांमुळे साखरेच्या दरात मोठी घसरण सुरू झाली आहे. 

‘एस’ साखरेला ३ एप्रिलपूर्वी ३६६५ रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत होता. एम (मोठी) साखरेला ३७०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिकचा दर होता. साखरेची आयात झाल्यावर पहिल्या आठवड्यातच ३६६५ हा दर ३६१० रुपये प्रतिक्विंटलवर येऊन पोचला होता. या दरात साखर स्थिर राहील, असे वाटत असतानाच व्यापारी वर्गाकडून साखरेचा उठाव थांबला. गरजू कारखाने दहा- वीस रुपये दर कमी करून नाईलाजाने साखर विकू लागले आणि मग दराची घसरण पुन्हा सुरूच राहिली. मागील चार- पाच दिवसांत ही घसरण तीव्र झाली आहे. ३ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत जवळपास प्रतिक्विंटल १४० रुपयांनी दर घसरले आहेत. 

‘भावाबाबत अंदाज करणे अवघड’
घोडगंगा कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार म्हणाले, ‘‘आमचा सहवीजनिर्मिती प्रकल्प तयार आहे; परंतु शासन वीज खरेदी करार करण्यास तयार नाही. त्यामुळे निर्माण झालेला आर्थिक गुंता सोडविण्यासाठी साखरविक्री करण्याशिवाय पर्याय नाही. अशाच पद्धतीने बहुतांश कारखान्यांना नव्या हंगामासाठी, कर्जफेडीसाठी, भावासाठी पैसे लागणार आहेत. त्यामुळे साखरविक्रीशिवाय पर्याय नाही, मात्र आयातीचा निर्णय झाला आणि उत्तर प्रदेशची साखर गुजरात व मध्य प्रदेशाला सत्तर ते ऐंशी रुपयांनी कमी मिळत असल्याने साखरेचे दर घसरत चालले आहेत. उत्तर प्रदेशात उसाच्या नव्या वाणामुळे साखर उताराही चांगला मिळाला आहे. शासनाचा भरवसा नसल्याने भावाबाबत अंदाज व्यक्त करणे अवघड आहे.’’

कर्जाच्या हप्त्यामुळे विक्री 
सोमेश्‍वर कारखान्याची दोन प्रतीतली ‘एस’ साखर ३५४० व ३५२५ रुपये प्रतिक्विंटल या दराने आज विकली गेली. घोडगंगा साखर कारखान्याची साखर कारखान्याची ‘एस’ साखर ३५३८ रुपये प्रतिक्विंटलने विकली गेली. ३५२५ ते ३५४० रुपये असे दर दिसत असले तरी, या दराला साखरेचा उठाव होत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीतले काही कारखाने दरात घट करून साखर विकू लागले आहेत. ही बाब व्यापाऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे. एकीकडे साखरेवरील उचलीवर वाढत चाललेले व्याज आणि दुसरीकडे भरून असलेली गोदामे यामुळे कारखान्यांना साखर विकायची आहे. किंबहुना शेतकऱ्यांकडून दुसऱ्या हप्त्याची मागणी होऊ लागल्याने आणि कर्जांचे हप्ते आल्याने कारखान्यांपुढे साखरविक्रीशिवाय पर्यायही नाही.

Web Title: factory loss by sugar import