उद्योगनगरीला लालदिव्याचे वेध 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

पिंपरी - महापालिका निवडणुकीत उज्ज्वल यश मिळवून भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आणल्यानंतर आता स्थानिक नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार मोठ्या जबाबदारीचे वेध लागले आहेत. सध्या शिवसेनेच्या भूमिकेमुळे सरकार स्थिर राहण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर राजकीय हालचालींना वेग येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर एप्रिलच्या शेवटच्या किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक नेत्यांना मोठी जबाबदारी मिळण्याचीही शक्‍यता व्यक्त होत आहे. 

महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहरात सत्ता मिळविल्यास लाल दिवा (मंत्रिपद) देऊ, असे आश्‍वासन दिले होते. मंत्रिमंडळाची पुनर्रचना होण्याची चिन्हे असल्याने आत्ताच काय ते पदरात पाडून घ्यावे, या हेतूने स्थानिक नेते प्रयत्नशील आहेत. याबाबत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांशी स्थानिक आमदारांनी चर्चाही केल्याचे समजते. उपलब्ध माहितीनुसार भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांच्यापैकी एकाला राज्यमंत्रिपद व एकाला प्राधिकरणाचे अध्यक्ष किंवा महामंडळ मिळू शकते. महेश लांडगे हे क्रीडा राज्य मंत्रिपदासाठी आग्रही आहेत, तर ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांना विधान परिषदेवर घेतले जाण्याची शक्‍यता आहे. एवढ्यात विधान परिषदेची निवडणूक नसली तरी आगामी काळात जी जागा रिकामी होईल, त्यावर प्राधान्याने पानसरे यांची वर्णी लागण्याची शक्‍यता विश्‍वसनीय सूत्रांनी वर्तविली आहे. 

...तर नेत्यांची नावे मागे पडणार 
पुणे महापालिकेतही भाजप सत्तेवर आला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाची पुनर्रचना होताना अनुभवी महिला सदस्य म्हणून आमदार माधुरी मिसाळ यांना संधी दिली जाईल अशी चर्चा आहे; तर मुख्यमंत्र्यांचे जुने विश्‍वासू सहकारी म्हणून आमदार बाळा भेगडे यांनादेखील मंत्रिपद मिळू शकते. मात्र, त्यांची वर्णी लागल्यास पिंपरी-चिंचवडच्या नेत्यांची नावे मागे पडू शकतात. मंत्रिमंडळाची पुनर्रचना झाल्यानंतर महामंडळांच्याही नियुक्‍त्या आगामी काळात होतील. आता त्याला मुहूर्त कधी मिळतो, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

मंत्रिमंडळ पुनर्रचनेची प्रतीक्षा 
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मुद्‌द्‌यावरून विरोधी पक्षांनी राज्य सरकारला घेरले आहे. सत्तेत असूनही शिवसेनेने विरोधी सूर आवळला आहे. त्यांच्या राजीनामाअस्त्राने सरकार अडचणीत येऊ शकते. त्यामुळे विरोधकांचे 22 आमदार जाळ्यात ओढण्याच्या हालचालीही भाजपमध्ये सुरू आहेत. शिवसेनेच्या काही आमदारांनाही सध्या निवडणूक नको आहे. या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांनाही मोठ्या जबाबदारीची अपेक्षा आहे. 

Web Title: fadanvis had assured ministers return to power in the city