पुणे : महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदूबाबास चोप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

- समर्थ पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी, अनिष्ठ रुढी अघोरी प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल 

पुणे : कौटुंबिक समस्या व विविध प्रकारच्या अडचणींनी ग्रस्त असणाऱ्या महिलांचे शोषण करुन त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या भोंदूबाबाला महिलांनी चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नाना पेठेत घडला. समर्थ पोलिस ठाण्यामध्ये दोघांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

भागवत उर्फ नंदकुमार वसंत भागवत (वय 68, रा. रास्ता पेठ), त्याचा मुलगा अभिजित नंदकुमार भागवत (वय 35) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका महिलेने समर्थ पोलिस ठाण्यात फिार्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला महिलेस कौटुंबिक समस्येने ग्रासले होते. त्यामुळे संबंधित महिला नंदकुमार भागवत उर्फ भाऊ भागवत याच्या घरी गेल्या. त्यावेळी त्याने महिलेची समस्येतून सुटका करण्याचा बहाणा केला. भागवत व त्याचा मुलगा अभिजीत याने संगनमत करुन फिर्यादींचा वेळोवेळी विनयभंग केला.

फिर्यादीस भावनाविवश करुन शारिरीक संबंध निर्माण केले. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करुन ते फेसबुक व सोशल मीडीयावर टाकून व्हायरल करण्याची भिती दाखविली. त्यानंतर महिलेची सदनिका अभिजीतच्या पुतण्याच्या नावे करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले. फिर्यादीबरोबरच अन्य महिलांना मूल होत नसल्यामुळे त्यांच्याशी अश्लील वर्तन करणे, भूतबाधा, डोक्‍यावरचे कोस उपटणे, भस्म देणे अशा प्रकारे भोंदुगिरी करीत होता.

दरम्यान, हा सर्व प्रकार फिर्यादींनी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपशहरप्रमुख रोहीणी कोल्हाळ यांना सांगितला. त्यांना बडतर्फ पोलिस शैलेश जगताप व परवेझ मुजावर यांनी कायदेशीर मार्गदर्शन केले.

या प्रकारामुळे चिडलेल्या महिलांनी रविवारी भोंदूबाबाच्या घरी जाऊन त्यास चांगलाच चोप दिला. त्यानंतर भोंदू बाबा व त्याच्या वडिलांना समर्थ पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा यांना प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fake Baba beaten by women in Pune