पुण्यात मेट्रो पुल पडल्याची अफवा; प्रत्यक्ष स्थिती कशी आहे पाहा व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 August 2020

वडगाव शेरी परीसरातील फिनिक्स मॉलजवळ मेट्रोचा पुल कोसळल्याचा फोटो सोमवारी रात्री व्हॉट्सअपवर व्हायरल झाला आणि पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली.

पुणे : वडगाव शेरी परीसरातील फिनिक्स मॉलजवळ मेट्रोचा पुल कोसळल्याचा फोटो सोमवारी रात्री व्हॉट्सअपवर व्हायरल झाला आणि पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली. तपासणीनंतर ही अफवा असल्याचे निदर्शनास आले. मात्र फोटोत जे ठिकाण सांगितले होते, त्या ठिकाणचा मेट्रो पुल कसा आहे, तुम्हीच पहा. अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिस प्रशासन कडक कारवाई करणार आहे.

व्हॉट्सअपवर सोमवारी रात्री अचानक एक मेसेज व फोटो येऊन धडकला. हा मेसेज व फोटो होता, पुण्यातील विमाननगर परिसरातील फिनीक्स मॉल जवळ असलेल्या मेट्रोचा पुल पडल्याचा. साहजिकच व्हॉट्सअपवर आलेला फोटो व मेसेजची कुठलीही खातरजमा न करता काही बहाददर लोकांनी क्षणाचाही विलंब न करता तत्काळ ते फॉरवर्ड करण्यास प्राधान्य दिले. तर काही सजग नागरीकांनी याबाबत पोलिस व प्रसारमाध्यमांशी संपर्क साधत खातरजमा केली. 

दरम्यान,या व्हायरल प्रकरणाची पोलिसांनी तत्काळ दखल घेतली. विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी प्रत्यक्षात पाहणी केली. त्यावेळी असे काहीही घडले नसल्याचे तसेच ती अफवा असल्याचे स्पष्ट केले.

हे वाचा - पुण्यात मेट्रो पूल पडल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल; पुणे प्रशासनानं दिलं स्पष्टीकरण

"ती" घटना खरच घडली का ?
पुल पडल्याची घटना घडली, मात्र ही घटना होती हरियाणा राज्यातील गुरुग्राम शहरातील सोहना रोडवरील आहे. तेथील एका पुलाचा स्लैब कोसळल्याचे हरियाणाचे उपमुख्यमंत्री यांनी दिली होती. तेच फोटो पुण्यातील मेट्रोचे असल्याचे भासवुन व्हॉट्सअपवर व्हायरल व्हायरल केले होते.

..तर अशी आहे खरी परिस्थिती
व्हाटसअपवर फिरत असलेल्या फोटो फिनिक्स मॉलजवळचा असल्याचे भासविले होते. प्रत्यक्षात मेट्रो पुलाचे काम फिनिक्स मॉल पर्यंत झालेले नाही. सध्या रामवाडीपासुन वडगाव शेरी चौकापर्यंतच मेट्रो पुलाचे काम झालेले आहे. तर तेथील  परिस्थिती प्रत्यक्षात कशी आहे. तुम्हीच पहा या व्हिडिओ व फोटोद्वारे.

अफवा पसरविणाऱ्यावर कारवाई 
सोशल मीडियाचा वापर करुन अफवा पसरवुन पोलिस, महापालिका, मेट्रो प्रशासनाची झोप उडविणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करणार असल्याचे विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fake photo viral claim pune metro pool collapse see actual situation