फसवणुकीचा नवा फंडा; पाचशे रुपये भरा अन्‌ नोकरीचे पत्र घ्या

sms-alerts
sms-alerts

पिंपरी - सध्या बेरोजगारी इतकी वाढलीय, की एक आशेचा किरण दिसला तरी तरुण त्याकडे धावतात; पण, याचाच गैरफायदा काही लोक घेतात. सध्या शहरात तरुणांच्या मोबाईलवर नोकरीसाठी तुम्ही निवडले गेले आहात, असा मेसेज फिरत आहे. त्यात पाचशे रुपयांची कामगार नोंदणीची फी म्हणून मागणी केली जात असल्याचे दिसून येत आहे.

नामांकित कंपनीच्या नावाखाली असलेले मेसेज पसरविले जातात, तसेच उद्या तुमची मुलाखत होणार आहे, असेही त्यात लिहिले जाते. नामांकित कंपनीच्या नावासोबत आलेल्या या टेक्‍स्ट मेसेजसोबत काही लिंक आणि व्हॉट्‌सॲप क्रमांकही दिलेला असतो. त्या लिंकवर क्‍लिक करून तुमचे नियुक्तिपत्र डाऊनलोड करून घ्या, असेही त्यात लिहिले जाते. त्या लिंकवर क्‍लिक केल्यास तुम्हाला तुमचे नियुक्तिपत्र, कामगारांना कायम करण्याचे नोंदणीपत्र आणि कंपनीच्या एका व्यक्तीचे ओळखपत्र डाऊनलोड करण्यास सांगितलेले असते. त्यावर क्‍लिक केल्यास हे दस्तऐवज डाऊनलोड होतात. यात नामांकित कंपनीच्या अगदी खरेखुरे दिसणाऱ्या लेटरहेडच्या पत्रावर हा सर्व मजकूर आणि त्याखाली कंपनी कॉर्पोरेट ऑफिस, असे लिहून सही केलेली असते. कोणीही यावर सहज विश्‍वास ठेवेल, असेच ते तयार केलेले असते. विशेष म्हणजे, यात असिस्टंट मॅनेजरसारखी मोठी पोस्ट, दहा ते पाच कामांचे तास, पाच दिवसांचा आठवडा, ४० ते ४८ हजार पगार, आगाऊ तीन महिन्यांचा पगार, कंपनीतर्फे राहण्याची सोय, छत्तीस वर्षांपर्यंत कोणत्याही कराराशिवाय कायम करून घेण्याचे आणि इतर अनेक प्रलोभने दिलेली असतात. आज नोंदणीचा शेवटचा दिवस असल्याचे सांगून यासाठी ऑनलाइन पद्धतीने कंपनीकडे नोंदणी करण्यासाठी पाचशे रुपये फीची मागणी केली जाते. हे पैसे पेटीएमवरूनच भरण्यास सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात कंपनीकडून असे कोणतेही मेसेज पाठविले जात नाहीत. हे सर्व खोटे आहे, असे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले आहे.

संबंधित व्हायरल मेसेज व इतर कोणत्याही मेसेजवर विश्‍वास ठेवू नये. कंपनीने मुलाखत न घेता नियुक्तिपत्र देणे तसेच नोकरीआधी पैशांची मागणी करणे, हे संशयास्पद आहे. कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन किंवा त्यांच्या नंबरवर फोन करून संबंधित मेसेजबाबत खात्री करून घ्यावी.
- सुधाकर काटे, सायबर पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com