खडकवासला उपकालव्याच्या गेटची पडझड 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

पुणे : खडकवासला धरणाच्या मुख्य कालव्याला धरणापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर बसवण्यात आलेल्या गेटच्या दगडी बांधकामाची पडझड झाली असून, यामुळे उपकालव्याला धोका निर्माण झाला आहे.

पुणे : खडकवासला धरणाच्या मुख्य कालव्याला धरणापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर बसवण्यात आलेल्या गेटच्या दगडी बांधकामाची पडझड झाली असून, यामुळे उपकालव्याला धोका निर्माण झाला आहे. हे गेट केंद्रीय जलविद्युत संशोधन केंद्राला (सीडब्ल्यूपीआरएस) पाणी वळवण्यासाठी बसवण्यात आले आहे.
खडकवासला येथे नवीन धरणे, कालवे, जलविद्युत प्रकल्प अशा वेगवेगळ्या प्रकल्पांचे मॉडेल बनवणारी केंद्रीय जल मंत्रालयाची सीडब्ल्यूपीआरएस ही शासकीय संस्था आहे. या संस्थेला वेगवेगळ्या प्रकल्पांच्या प्रतिकृतींची चाचणी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्‍यकता असते. त्यामुळे खडकवासला धरणातून जाणाऱ्या कालव्याला गेट बसवून तेथून उपकालवा काढण्यात आलेला आहे. बऱ्याच वर्षांपासून या उपकालव्याची दुरुस्ती करण्यात न आल्याने दगडी भिंतींची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. वेळीच या भिंतींची दुरुस्ती करण्यात आली नाही, तर मुख्य कालवा फुटू शकतो अशी परिस्थिती आहे. कालव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी सुरू असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याचेही दिसून येत आहे. 
याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी फोन न उचलल्याने तो होऊ शकला नाही. सीडब्ल्यूपीआरएस'च्या संचालक कार्यालयातील अधिकारीही सुटीवर असल्याचे समजले. 
सीडब्ल्यूपीआरएस' संस्थेतील पाण्याच्या संदर्भात काम पाहणारे वैज्ञानिक (इ) विभागातील अधिकारी योगेंद्र श्रीवास्तव यांना याबाबत विचारले असता, तातडीने आमचे कर्मचारी पाठवून तेथील पाहणी करून घेतली जाईल व आवश्‍यक ती दुरुस्ती करून घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच माहिती दिल्याबद्दल सकाळचे आभार मानले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fall of the gate of the canal to Khadakwasla