खेड - रेटवडी येथे अंगणवाडीची इमारत कोसळली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

दावडी : रेटवडी (ता.खेड) येथील वरची ठाकरवाडी मधील अंगणवाडीची इमारत शुक्रवारी (दि.29) रोजी पावसामुळे कोसळली. सदर इमारत तीन वर्षांपासुन धोकादायक झालेली असल्याने अंगणवाडी एक वर्षापासुन समाजमंदिरात भरवण्यात येत होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

दावडी : रेटवडी (ता.खेड) येथील वरची ठाकरवाडी मधील अंगणवाडीची इमारत शुक्रवारी (दि.29) रोजी पावसामुळे कोसळली. सदर इमारत तीन वर्षांपासुन धोकादायक झालेली असल्याने अंगणवाडी एक वर्षापासुन समाजमंदिरात भरवण्यात येत होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

वरची ठाकरवाडी येथील इमारतीच्या भिंतींना तीन वर्षांपासुन तडे गेले होते. खोलीतील फरश्याही अनेक ठिकाणी खचल्या होत्या. पायाचे दगडही अनेक ठिकाणी निघाले होते. अंगणवाडीसाठी नवीन इमारत बांधून मिळावी यासाठी ग्रामस्थांनी अनेकवेळा मागणी केली होती. दैनिक सकाळनेही दोन वर्षापुर्वी ही धोकादायक कोसळण्याचा इशारा देणारे वृत्त प्रसिध्द केले होते. मात्र प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. अंगणवाडी धोकादायक बनल्यामुळे कोणती दुर्घटना घडू नये म्हणुन यावर्षी अंगणवाडी जवळच्याच समाजमंदिरात भरवली जात होती. दोन वर्षांपासुन अंगणवाडीच्या इमारतीची मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थ नाराज आहेत. या अंगणवाडीत 20 विद्यार्थी शिकत आहेत व लहान मुले पडलेल्या अंगणवाडीच्या व्हरांड्यात जेवायला बसत असत. सुदैवाने अंगणवाडी शुक्रवारी नेहमीप्रमाणे दुपारी सुटल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 

अंगणवाडी इमारत मंजूर झाली असेही ग्रामस्थांना सांगण्यात आले होते, मात्र दोन वर्ष होऊनही बांधकाम का होऊ शकले नाही हे मात्र कोणी अधिकारी सांगू शकत नाही. शनिवारी दुपारी खेड पंचायत समिती बालकल्याण विभागाच्या अधिकारी सणस मॅडम, सुपरवायझर बेबी ठाकरे यांनी पडलेल्या इमारतीचा पंचनामा केला. यावेळी सरपंच संगिता बांगर, ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल, पोलीस पाटील उत्तम खंडागळे, सुभाष हिंगे उपस्थित होते. ठाकरवाडीसाठी अंगणवाडीची नवीन इमारत मंजूर करून त्वरीत बांधकाम करण्याची मागणी माजी सरपंच नामदेव डुबे, सुभाष हिंगे व ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: fallen wall of anganwadi in retwadi