कुटुंबासह साहसी पर्यटनाचा ट्रेंड!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

पुणे - पर्यटनाचे विविध ट्रेंड्‌स गेल्या काही वर्षांत समोर येत असून, असाच एक ट्रेंड म्हणजे कुटुंबासोबत साहसी पर्यटन करण्याचा. कुटुंबासोबतच स्वतःमधील क्षमतेला, इच्छाशक्तीला आव्हान देत कमीत कमी वेळेत, कधी सायकलने तर कधी दुचाकीवर अधिकाधिक अंतर पार करण्याचा निश्‍चय नागरिक करीत आहेत. त्यातून कुटुंबाची सैर तर होतेच; पण आरोग्यही सुदृढ बनत आहे आणि नात्यातील गोडवाही वाढत आहे.   

साहसी पर्यटनात ‘रिव्हर राफ्टिंग’, गड-किल्ले फिरणे, डोंगरावर चढाई करणे, घोडेस्वारी, दुचाकीवर लांबचा पल्ला गाठणे यांचा समावेश आहे. अनेकदा एकट्याने किंवा समवयस्कर मित्रांसोबत या करामती केल्या जायच्या. मात्र कुटुंबासोबत अशा प्रकारच्या गोष्टींचा अनुभव घेणे दुर्मिळ असायचे. परंतु अलीकडील काळात हे चित्र बदलताना दिसत आहे. अनेक नागरिक कुटुंबासोबत धाडसी मोहिमा यशस्वीपणे पार पाडत आहेत.

यामध्ये पुणे ते गोवा, कन्याकुमारी, केरळ, लेह- लडाख, काश्‍मीर अशा ठिकाणी कमीत कमी दिवसांत सायकलने प्रवास करणे, दुचाकी गाड्यांवर प्रवास केला जात आहे. 

नुकताच आपल्या कुटुंबासोबत पुणे ते गोवा असा सायकल प्रवास केवळ तीन दिवसांत पूर्ण करणारे डॉ. सतीश पाटील म्हणाले, ‘‘एकट्याने अथवा मित्रांसोबत देशात तसेच विदेशात अनेक वेळा फिरलो आहे. दुचाकीवर, सायकलने दूरचे अंतर गाठायच्या अनेक मोहिमा केल्या आहेत. मात्र कुटुंबासोबत एकत्रित तेही सायकलने प्रवास करण्याची ही पहिलीच वेळ होती. खूपच वेगळा अनुभव होता. एरव्ही आपापल्या आयुष्यात व्यस्त असल्यामुळे एकमेकांना वेळ देता येत नव्हता. मात्र या प्रवासादरम्यान एकमेकांसोबत बराच वेळ घालवायला मिळाला. एकमेकांना अधिक चांगले समजून घेता आले. त्यातून कुटुंबासोबत असणारे संबंध अधिक दृढ झाल्याचा अनुभव मला या प्रवासातून मिळाला.’’ 

मित्रांसोबत फिरायला जाण्याचा ट्रेंड पूर्वीपासून आहे. परंतु सहकुटुंब जाणे क्वचित असायचे. पण आता कुटुंबासह जाण्याचा ट्रेंड हळूहळू रुजत आहे. त्यामुळे कुटुंबातील नातेसंबंध अधिक घट्ट होत आहेत. कुटुंबासोबत साहसी पर्यटनाचा आनंद निराळाच. 
- डॉ. सतीश पाटील

Web Title: Family adventure tourism trends!