फॅमिली डॉक्‍टर संकल्पना रुजणे काळाची गरज - गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

वृत्तपत्र एवढ्याच मर्यादित स्वरूपात न राहता अनेकविध विधायक उपक्रम राबवून ‘सकाळ’ प्रत्येक परिवारातील एक घटक झाला आहे. आपत्तीच्या काळातही ‘सकाळ रिलीफ फंड’ महत्त्वाची भूमिका बजावत असतो. 
- गिरीश बापट, खासदार

बावधन - वैद्यकीय सेवा देताना डॉक्‍टरांना पूर्वीपेक्षा जास्त अडथळे येत आहेत. त्यातून डॉक्‍टरांची सुरक्षितता हा सर्वांत गंभीर प्रश्‍न बनला आहे. पूर्वी असलेली ‘फॅमिली डॉक्‍टर’ ही संकल्पना नव्याने रुजणे आता या काळाची गरज आहे, असे मत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले. 

वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्‍टरांचा ‘सकाळ’च्या वतीने ‘हेल्थ मंत्रा कृतज्ञता गौरव’ करण्यात आला. या वेळी बापट बोलत होते. कार्यक्रमाला ‘राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थे’तील (एनआयओ) नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर, ‘सकाळ’चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर उदय जाधव, वरिष्ठ सरव्यवस्थापक शैलेश पाटील, सरव्यवस्थापक उमेश पिंगळे, सहयोगी संपादक रमेश डोईफोडे आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. जयंत अभ्यंकर, डॉ. नीरज आडकर, डॉ. तृप्ती पारे, डॉ. संदीप अगरवाल, डॉ. स्निग्धा अगरवाल, डॉ. अनिल दुधभाते, डॉ.सुमीत शाह, डॉ.मनोज कोचेटा, डॉ. अरविंद मेहरे, डॉ. आदिती अरविंद मेहरे, डॉ. प्रियांका सावकार- नवले, डॉ. अविनाश देवरे, डॉ. विद्या देवरे, शेली लॅंथर, डॉ. ज्योत्स्ना पाटील, डॉ. प्रमोद पाटील यांचा सन्मानचिन्ह देऊन बापट आणि डॉ. केळकर यांनी गौरव केला.

बापट म्हणाले, ‘‘डॉक्‍टर हा प्रत्येक कुटुंबाचा आधार आहे; परंतु वैद्यकीय क्षेत्रातील स्पर्धात्मक युगात ‘फॅमिली डॉक्‍टर’ ही संकल्पना बंद पडत चालली आहे. कुटुंबाची गरज लक्षात घेऊन ही संकल्पना पुन्हा सुरू व्हावी. डॉक्‍टरांना रुग्णसेवेचे काम करताना अनेक अडचणी येतात. त्यात त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. डॉक्‍टर किंवा रुग्णालयांमधील व्यवस्थापन याबाबत रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये गैरसमज पसरले आहेत.’’ 

डॉ. केळकर म्हणाले, ‘‘डॉक्‍टरांवरील हल्ले ही ज्वलंत समस्या आहे. डॉक्‍टरांवर त्याचा ताण आहे, तसाच तो सरकारी अधिकाऱ्यांवरही पडत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी मार्ग काढण्याची गरज निर्माणझाली आहे.’’ 

या वेळी आशा भोसले यांनी गायिलेल्या ‘आशा द व्हर्सटाइल लीजंड’ ही जुन्या गीतांची मैफल झाली. शैलेश पाटील यांनी प्रास्ताविक, तर सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family Doctor Medical Treatment Girish Bapat