फॅमिली वॉकेथॉनला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

पुणे - कमॉन पुणेकर, लेट्‌स्‌ एन्जॉय, वुईथ वॉकेथॉन ! कुटुंबासह फिरायला चला...फिटनेसचा फंडा जाणून घ्या. निसर्गरम्य तळजाई टेकडीवर..."सकाळ'च्या या आवाहनास पुणेकरांनी रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बहुसंख्येने आलेल्या आबालवृद्धांनी कुटुंबीयांसमवेत वॉक घेतला अन्‌ मराठी तारकांसमवेत झुंबा डान्सही केला. सकाळची सूर्यकिरणे अंगावर झेलत, आल्हाददायक वातावरणात पुणेकरांनी या उपक्रमाचा आनंद घेतला.

मदर्स डेनिमित्त, "फॅमिली वॉकेथॉन वुईथ सकाळ' हा उपक्रम आयोजिला होता. तळजाई टेकडीवरील तळजाई देवीच्या मंदिरापासून ठुबे बंगला आणि तेथून पुन्हा मंदिर येथपर्यंतच्या वॉकमध्ये पुणेकर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. कोणी मुलांसोबत, तर कोणी मित्र-मैत्रिणींसमवेत, तर कोणी घरातील वडीलधाऱ्यांसमवेत! एरवी दर रविवारी गजबजलेली तळजाई टेकडी आज गर्दीने बहरून गेली होती. राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, साहित्य, कला आदी विविध क्षेत्रातील नागरिकांनी या वॉकेथॉनबद्दल "सकाळ'ला भरभरून शुभेच्छा देतानाच आवर्जुन सेल्फीही काढल्या आणि त्याचे प्रत्यंतर सोशल मीडियावर दिवसभर दिसत होते. फिटनेसचा फंडा लोकप्रिय करण्यासाठी "सकाळ'ने वॉकेथॉनसारखे उपक्रम वारंवार आयोजित करावेत, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली. महापौर मुक्ता टिळक यांनी झेंडा दाखविल्यावर उत्साहाच्या वातावरणात वॉकेथॉनला प्रारंभ झाला. महापौरांसमवेत विविध पक्षांचे नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते, नागरिकांचाही त्यात समावेश होता. महापौर टिळक यांनी नागरिकांशी संवाद साधताना चालण्याच्या व्यायामाचे महत्त्व सांगितले. "सकाळ'चे संचालक (ऑपरेशन) भाऊसाहेब पाटील, संपादक सम्राट फडणीस यांनी पुणेकरांशी संवाद साधला.

अभिनेत्री सुवर्णा काळे, रिना लिमण, मॉडेल अनू शिंदे यांच्या समवेत नागरिकही उत्साहाने झुंबा डान्स करत होते. या वेळी "सकाळ'तर्फे आयोजित लकी ड्रॉमध्ये यशस्वी ठरलेल्या 50 नागरिकांना भेटवस्तू देण्यात आल्या. तळजाई भ्रमण मंडळ, श्रीहरी योग ग्रुप, हिट टू फिट ग्रुप, झिंगाट फॅमिली ग्रुप, योग ग्रुप, तळजाई भ्रमण ग्रुपचे सदस्य व पुणेकरांनी तळजाई टेकडीवर फिरण्याचा आनंद घेतला. बीव्हीजी ग्रुपतर्फे रुग्णवाहिकेची व्यवस्था होती.

Web Title: familywalkathon sakal morning walk program taljai hill occasion mothers day