झुंबाच्या तालावर रंगला वॉकेथॉन

Walkathon
Walkathon

पुणे - संगीताच्या तालावर आबालवृद्धांची थिरकलेली पावले आणि टाळ्या, शिट्ट्यांच्या प्रतिसादात जागतिक ‘मदर्स डे’निमित्त आयोजित ‘फॅमिली वॉकेथॉन वुईथ सकाळ’ रविवारी तळजाई टेकडीवर रंगला. निसर्गाच्या सान्निध्यात मोठ्या प्रमाणावर उपस्थित वाचकांनी कुटुंबासह वॉक केलाच; पण झुंबा डान्स अन्‌ हिंदी-मराठी गीतांवरही नवतारकांसह ठेका धरला. या अफाट उत्साहाला वयाचे बंधन आड आले नाही अन्‌ ‘वॉक’ला गर्दीचे ! 
महापौर मुक्ता टिळक यांनी झेंडा दाखवून वॉकेथॉनचे उद्‌घाटन केले.

तळजाई देवी मंदिरापासून ठुबे बंगला व तेथून पुन्हा मंदिरापर्यंत वॉकेथॉनच्या निमित्ताने पुणेकरांनी मनापासून आनंद लुटला. महापौर टिळक यांच्यासह विविध पक्षांचे नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी वॉकेथॉनमध्ये सहभागी झाले होते. राजकीय भाष्य अथवा गप्पा-चर्चा विसरून सर्वजण ‘मॉर्निंग वॉक’च्या मूडमध्ये हास्यविनोद करीत एकत्र आले होते.

कुटुंबाला जोडते ती आई... कुटुंबाला सांभाळते ती आई... आईने जोडलेल्या, सांभाळलेल्या कुटुंबाला... एकत्र आणूया आणि आईसाठी चालूयात... मनापासून आवडलेल्या या संकल्पनेचे अनेकांनी स्वागत केले. आकाशात फुगे उडवत आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आम्ही दररोज चालणारच, असा निर्धारही अनेकांनी केला. ‘सकाळ’च्या या अभिनव उपक्रमाचे पुणेकरांनी भरभरून कौतुकही केले. चालून आल्यानंतर हिंदी-मराठी गाण्यांच्या ठेक्‍यावर आबालवृद्धांची पावले थिरकली.

‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’...‘कमॉन पुणेकर’, ‘कमॉन एव्हरीबडीज’ असे म्हणत मनात येईल तसे नाचा, नाचण्याचा आनंद घेत निरोगी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन करणारी अभिनेत्री सुवर्णा काळे, रीना लिमण आणि मॉडेल अनुजा शिंदे या तारकांसोबत महिला-पुरुषांनी देहभान हरपून झुंबा डान्सही केला. नृत्य प्रशिक्षक गौरी यादव, प्रतीक्षा फिरोदिया, चेतन राठी यांनी उपस्थितांना झुंबा डान्सच्या टिप्स दिल्या. दरम्यान, यानिमित्ताने काढलेल्या ‘लकी ड्रॉ’मधील विजेत्यांना महापौर व अभिनेत्रींच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

आई निरोगी असेल तर कुटुंब निरोगी राहते. आई-वडिलांच्या संस्कारांचे अनुकरण मुले करतात. पुढच्या पिढीलाही अशा उपक्रमांतून चांगला संदेश जातो.
- श्रीनिवास शिंगरे

माझे सासरे दिलीप मेहता, पती दिलीप, जाऊ स्वाती आणि आमची मुले आम्ही वॉकेथॉनला यायचे ठरविलेच होते. असे उपक्रम ‘सकाळ’ने राबवावे. त्यामुळे ‘फॅमिली बाँडिंग’ वाढेल.
- केवल मेहता 

‘आईसाठी चालूयात...’ या ‘सकाळ’च्या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देते. आई ही घराचा कणा असते. तिच्यासाठी चालूयात आणि मन प्रसन्न ठेवूया. आपण सारे तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज चालण्याचा व्यायाम सुरू करण्याचा संकल्प या निमित्ताने करूयात. 
- मुक्ता टिळक, महापौर  

प्रत्येकाच्या यशामध्ये आईचा मोलाचा वाटा असतो. मी वकील झाले आणि डान्स शिकले. त्यासाठी आईने मला मदत केली. आईच्या प्रेमापोटी आपण सारे येथे एकत्र आलो आहोत. ही सुरवात असून दररोज चालूयात.
- रीना लिमण, अभिनेत्री

आईनेच तर आपल्याला जग दाखविले आहे. तिच्यासाठी चालूयात म्हणजे तिच्या कष्टाचीही जाणीव आपल्याला राहील. तसेच आईसाठी खूप काही करता येईल.
- सुवर्णा काळे, अभिनेत्री 

‘वॉकेथॉन’च्या माध्यमातून महिलांना घराबाहेर पडण्याची संधी मिळेल. घरातील महिलेची प्रकृती ठीक असेल, तर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते.
 -अनुजा शिंदे, मॉडेल  

माझी आई शिवणकाम करीत असे. त्यामुळे तिचे गुडघे दुखायला लागले. डॉक्‍टरांनी तिला चालण्याचा सल्ला दिला. तिच्यासोबत आम्हीही दररोज चालायला जातो.
- अभिषेक सांडभोर 

माझी आई आम्हा भावंडांसाठी दैवत आहे. तिच्यामुळेच आम्ही घडलो. आमच्या शेवटच्या श्‍वासापर्यंत आमच्यासाठी दररोजचा दिवस मदर्स डे आहे.
- रोहित शहा

महापौरांसह नगरसेवकांचाही सहभाग 
महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक विशाल तांबे, वर्षा तापकीर, राजेंद्र शिळीमकर, राणी भोसले, साईदिशा माने, बाळासाहेब धनवडे, महेश वाबळे, अमित बागूल, श्रीनिवास जगताप आदी या ‘वॉकेथॉन’मध्ये सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी नगरसेविका आश्‍विनी कदम आणि नितीन कदम यांच्यासह महेश नागरी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे मगराज राठी यांचेही सहकार्य लाभले. 

#FamilyWalkathon हा हॅश टॅग वापरा आणि फॅमिली वॉकेथॉनमधील तुमचे सेल्फी आणि तुमचे अनुभव ‘सकाळ’शी शेअर करा फेसबुक, ट्विटर आणि ई-मेलवर.

‘फॅमिली वॉकेथॉन’मधील सहभागी नागरिकांच्या प्रतिक्रिया, आलेले अनुभव व फोटो ‘प्रतिबिंब पुरवणी’त प्रसिद्ध करणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com