बर्थ डे स्पेशल...अमोल कोल्हे यांच्या गनिमीकाव्यापुढे विरोधक हतबल

नीलेश शेंडे
Friday, 18 September 2020

एकेकाळी मनसेचा झेंडा हातात घेऊन जुन्नर विधानसभेचा गड काबीज करण्याचे डॉ. अमोल कोल्हे यांचे लक्ष्य होते. पण, त्यांनी शिवबंधन हातात बांधले. त्यानंतर अचानक राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधून शिरूर लोकसभा मतदारसंघात चमत्कार घडवला. पहिल्याच वर्षात संसदरत्न पुरस्कारावर आपले नाव कोरले. डॉक्टर- ॲक्टर ते थेट खासदार...असा त्यांचा झंझावती प्रवास आहे.

पुणे : देशभरात दीड वर्षांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाली होती. त्यावेळी शिरूर मतदारसंघात नेहमीप्रमाणे चर्चा सुरू झाली की, या वेळी आढळरावदादांच्या समोर बळीचा बकरा कोण होणार...कारण, मतदारसंघात जोर बैठका मारायला सुरवात केलेले भोसरीचे पहिलवान आमदार महेश लांडगे यांच्या शड्डूचे आवाज आखाड्यात उतरण्यापूर्वीच विरले होते. त्यानंतर विलास लांडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. दहा वर्षांपूर्वी उमेदवार असताना ते जेवढे ॲक्टिव्ह नव्हते, तेवढे ते या वेळी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच झाले. तसेच, गतवेळेचे उमेदवार देवदत्त निकम हेही उमेदवारीसाठी सुप्त इच्छुक असल्याचे दिसून आले. मात्र, मतदारसंघात एका नावाची चर्चा सुरू झाली होती, ते म्हणजे डॉ. अमोल कोल्हे...

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज ही मालिका प्रसिद्धीच्या एव्हरेस्टवर पोचली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या जुन्नरमधील या सुपुत्राने तमाम मराठी माणसांच्या मनावर मोहिनी घातली होती. छत्रपती शिवाजी महाराज की...अस म्हटलं की, ज्यांच्या तोंडून आपोआप जय...असा घोष निघतो, ती प्रत्येक व्यक्ती अमोल कोल्हे यांच्या प्रेमात पडलेली होती. असा हुकमी एक्का राष्ट्रवादीकडे आकर्षित झाला होता. जणू काही राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी ही सुवर्णसंधीच चालून आली होती. या संधीचे सोने करण्याचे अखेर राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी ठरवले.

Image may contain: 3 people, people standing, text that says 'ष्ट्रवादी काँग्रेस महार ਟे if'

जशी राष्ट्रवादीला अमोल कोल्हे यांची गरज होती, तशीच त्यांनाही राष्ट्रवादीची गरज होती. सक्रिय राजकारणात त्यांनी पाऊल टाकलेले होतेच. एकेकाळी मनसेचा झेंडा हातात घेऊन जुन्नरचा गड काबीज करण्याचा त्यांचा बेत होता. पण, घड्याळाचे काटे फिरले आणि त्यांनी शिवधनुष्य हाती घेतले. त्यांची अमोघ वकृत्वशैली शिवसैनिकाला साजेशी होती. पण, शिवाजीराव आढळराव पाटील या चाणाक्ष राजकारण्याने त्यांच्यातील महत्त्वाकांक्षा ओळखळी होती. त्यामुळे मतभेदाचे सुरुंग पेटत गेले आणि शेवटी कोल्हे यांनी शिवबंधन तोडून घड्याळ बांधायचा निर्णय घेतला. त्यांच्या रूपाने राष्ट्रवादीला शिरूरमध्ये विजयाच्या दारात पोचण्याचा राजमार्ग सापडला होता.  

अमोल कोल्हे यांच्या दौऱ्यांना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. शिरूरचे वारे उलटे फिरायला लागले होते. शिरूर मतदारसंघात आढळराव यांचे स्थान अढळ आहे, या कल्पनेला धक्का बसायला सुरवात झाली होती. आढळरावांसमोर या वेळी बळीचा बकरा नसेल, तर स्वतः दादाच बळी ठरतील, अशी चर्चा जोर धरू लागली. साक्षात पवारसाहेब घाबरून पळाले, अशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली गर्वाची भावना खाली यायला सुरवात झाली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरत होता आणि शिवसेनेचे कार्यकर्ते चिंतेत गेले होते. लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेचा प्रचार करण्याची संधी राष्ट्रवादीतील इच्छुकांनी साधली. अमोल कोल्हे यांच्या प्रतिमेचा आपल्याला फायदा होईल, याचा विचार करून विधानसभेचे मनापासून इच्छुकही कामाला लागले. कधी नव्हे ती राष्ट्रवादी लोकसभेला जोमात आली.

No photo description available.

अमोल कोल्हे यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू होता. पण, राज्यात चित्र उलटे होत. भाजपचे कमळ आणि त्या बरोबर शिवसेनेचा बाण सुसाट चालला होता. आर. आर. पाटील यांची कमतरता जाणवत होती. त्यामुळे अमोल कोल्हे नावाचा पत्ता शिरूरपुरता मर्यादित ठेवून चालणार नाही, हे राष्ट्रवादीच्या चाणक्यांनी हेरले. बारामतीमध्ये भाजपने ताकद लावली होती. त्यामुळे थेट बारामतीच्या जिरायती भागातच अमोल कोल्हे यांची सभा झाली. प्रचंड प्रतिसाद मिळाला. घड्याळाचे काटे सुरळीत झाले. अमोल कोल्हे हा ब्रॅण्ड किती फायदेशीर ठरू शकतो, याची ती चुणूक होती.

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे शूटिंग, स्वतःच्या मतदारसंघातील प्रचार आणि राज्यातील उमेदवारांच्या प्रचारसभा, असा अमोल कोल्हे यांचा दिवसरात्र कार्यक्रम सुरू होता. मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतली होती. जेथे जाईल तिथे मदतीची थैली पुढे येत होती. तुम्ही काळजी करू नका...आम्ही आहोत, असा दिलासा मिळत होती. जणू काही निकाल लागला होता. आता फक्त लीड मोजायचे, अशीच चर्चा सुरू झाली आणि अखेर शिरूरमधील अढळ पद खालसा झाले.

No photo description available.

लढाई संपली नव्हती, तर आता कोठे ठिणगी पडली होती. राष्ट्रवादीला विधानसभा खुणावू लागली होती. त्यासाठी अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी हे दोन शिलेदार घेऊन राष्ट्रवादीचे दादा राज्याच्या दौऱ्यावर गेले. शिवनेरीवरून रायगडला निघालेली ही शिवस्वराज्य यात्रा...शिव या नावावर आणि भगव्या झेंड्यावर एकट्या शिवसेनेचा हक्क नाही, हे दाखवून देणारी ठरली. राष्ट्रवादीच्या झेंड्यासोबत भगवाही फडकू लागला. त्यातून पुढे वाद झाले. मात्र, शिवाजी महाराजांचे विचार रक्तात भिनलेल्या या दोन अनमोल रत्नांनी इतिहास घडवायला सुरवात केली होती. अस्तित्वासाठी धडपडणारी राष्ट्रवादी भविष्यात सत्ता उपभोगेल, असं जर कोणी दीड वर्षापूर्वी सांगितलं असतं, तर त्याला वेड्यात काढले गेले असते. पण, आज ते सत्य आहे. त्याला साताऱ्यातील पावसापासून अनेक कारणे आहेत...पण या अमोल कर्तृत्वाकडे कदापी दुर्लक्ष करून चालणार नाही, हेही तेवढेच खरे आहे.

विधासभेच्या प्रचाराच्या धामधुमीतून बाहेर पडत अमोल कोल्हे यांनी आपल्या खासदरकीच्या जबाबदारीवरही लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभेतील पहिल्याच भाषणात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुकाची थाप मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी पहिल्याच वर्षात संसदरत्न किताबावरही आपले नाव कोरले. पण, शिरूरमधील जनतेला आढळराव पाटील यांच्यासारख्या दांडगा जनसंपर्क असलेल्या नेत्याची सवय झाली होती. त्यामुळे या मतदारसंघातील नेता दहावा- तेराव्यात घडतो, असे म्हणतात. पण, अमोल कोल्हे त्यात अजून तरी सूट झालेले दिसत नाही. पण, एका खासदाराने लोकसभेत कोणते काम केले पाहिजे, हा आदर्श ते नक्की घालून देत आहेत. 

अमोल कोल्हे यांनी आपल्यातील मुरब्बी राजकारणी थेटपणे दाखवून दिला नाही. लोकसभेच्या निवडणुकीत थेट जातीवरून वाद उफाळला तरी त्यांनी संयमाची भूमिका दाखवली. प्रचारात विरोधकांकडून त्यांचे जुने व्हिडिओ व्हारल केले गेले. मात्र, त्यांनी प्रत्येक आरोपांना आणि टीकेला संयमाने उत्तर दिले. आजही त्यांच्या विरोधात व्यंग्यचित्रांमधून टीकाटिप्पणी केली जात आहे. मात्र, त्याचवेळी त्यांचे विरोधक हतबल होऊन आरोपही करत आहेत की, अमोल कोल्हे यांच्याकडूनच माझ्या पक्षांतराच्या चर्चा होत आहेत. खरे तर विरोधकांची ही हतबलता अमोल कोल्हे यांच्यातील मुरब्बी राजकारण्याची ओळखून करून देणारी ठरली आहे. पण, नेत्याने कितीही उंचीवर गेले तरी जनतेशी नाळ तुटू दिली नाही पाहिजे, हे त्यांनी त्यांच्या सध्याचे नेते असलेल्या पवारसाहेबांकडून नक्कीच शिकले पाहिजे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From famous actor to successful leader - MP Amol Kolhe Conflicting life journey